नवी मुंबई,दि.7:- कोकण महसूल विभागात महसूल सप्ताहाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. कोकण भवनातील महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आज कोकण भवनाच्या आवारात आरोग्य तपासणी शिबिराने महसूल सप्ताहाची सांगता झाली. कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
दैनंदिन कार्यालयीन कामकाजाबरोबरच प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने 40 वर्षावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी आवश्यक केली आहे. या अनुषंगाने दि. 1 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहाच्या सांगता समारोपाच्या दिवशी कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनातून दि. 7 व 8 ऑगस्ट या दोन दिवशी कोकण भवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज कोकण भवनातील महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तर उद्या दि. 8 ऑगस्ट रोजी महसूल विभागाव्यतिरीक्त इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोपरखैरणे येथील ओम गगनगिरी रुग्णालयाच्या वतीने ही आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. ओम गगनगिरी रुग्णालयाचे 3 डॉक्टर आणि 7 तंत्रसहाय्यक यांच्या मदतीने डॉ. प्रकाशराव शेंडगे यांच्या नेतृत्वात सर्व वैद्यकीय तपासण्या करण्यात येत आहेत. या वैद्यकीय तपासणी शिबिरात शारीरिक तपासणी, फुफ्फुस तपासणी, रक्ताचे नमुने तपासणी, क्ष-किरणाद्वारे तपासणी, पाठीच्या कण्याची तपासणी, ह्दयाची तपासणी, डोळ्यांची तपासणी या सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात येत आहेत. या रुग्णालयामार्फत या आरोग्य तपासणी शिबिरासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असे वातानुकुलित आरोग्य तपासणी वाहन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. वर नमूद सर्व तपासण्या या एका वाहनामध्ये करण्यात येत आहेत. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना एकाच छताखाली एकाच ठिकाणी सर्व आरोग्य तपासण्या करणे सोयीचे होत आहे.
यावेळी महसूल सप्ताहानिमित्त महसूल सप्ताहाची थोडक्यात माहिती असलेला सेल्फी पॉईंट उभारण्यातआला होता. तिथे कोकण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेल्फी काढले.
या आरोग्य शिबिरास महसूल विभागातील उपायुक्त (महसूल) विवेक गायकवाड, उपायुक्त गिरिष भालेराव, नायब तहसिलदार माधुरी डोंगरे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. कोकण भवनातील महसूल विभागाचे अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांनी या शिबिरास उत्तम प्रतिसाद दिला.