Home ताज्या बातम्या बेकायदा डोंगर फोडून, दगड आणि मुरूम उपसल्याने जिल्हा प्रशासनाने महापालिकेला तब्बल दोन कोटी रुपयांचा दंड (रॉयल्टीसह) ठोठावला

बेकायदा डोंगर फोडून, दगड आणि मुरूम उपसल्याने जिल्हा प्रशासनाने महापालिकेला तब्बल दोन कोटी रुपयांचा दंड (रॉयल्टीसह) ठोठावला

0

बेकायदा डोंगर फोडून, दगड आणि मुरूम उपसल्याने जिल्हा प्रशासनाने महापालिकेला तब्बल दोन कोटी रुपयांचा दंड (रॉयल्टीसह) ठोठावला

पुणे – कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी ठेकेदार कंपनीने बेकायदा डोंगर फोडून, दगड आणि मुरूम उपसल्याचे उघड झाल्याने जिल्हा प्रशासनाने महापालिकेला तब्बल दोन कोटी रुपयांचा दंड (रॉयल्टीसह) ठोठावला आहे. विशेष म्हणजे, डोंगर फोडण्याबाबतची कल्पना ठेकेदाराने न दिल्यानेच महापालिकेला हा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

कात्रज चौक ते खडीमशिन चौकापर्यंतच्या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या रस्तारुंदीकरणाचे काम सुरू आहे. तब्बल १६२ कोटी रुपयांचे हे काम ठेकेदार  कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 

कोंढव्यातील डोंगर फोडून सुमारे ४२ हजार ४२४ ब्रास मुरूम आणि दगड काढल्याचे जिल्हा प्रशासनाच्या पाहणीत आढळले. त्यानुसार महापालिका आणि ठेकेदार कंपनीला नोटीस देत खुलासा करण्यासाठी  मुदत दिली होती. परंतु, डोंगर फोडण्याबाबत ठेकेदाराने महापालिकेला कल्पना दिली नाही. त्यामुळे महापालिकेने रॉयल्टीसह सुमारे दोन कोटींचा  दंड भरण्यासाठी चलन तयार केले आहे.  

दरम्यान, येथील डोंगर परवानगी घेऊन फोडला असता,तर त्याला दंड आकारला नसता, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महापालिकेकडून चलन तयार
बेकायदा उत्खनन केल्याचा ठपका ठेवत जिल्हा प्रशासनाने पालिका आणि ठेकेदार कंपनीला ९ ऑगस्टला नोटीस बजावली. त्यावर १६ ऑगस्टला सुनावणी झाली. कारवाईची व्याप्ती वाढविण्याची शक्‍यता निर्माण होताच, पालिकेने २२ ऑगस्टला दोन कोटी रुपयांच्या रकमेचे चलन तयार केले आहे. दरम्यान, या कामात रॉयल्टीसाठी तरतूद केली आहे. त्यातून ती भरणार असल्याचे पालिकेने सुनावणीत कबूल केले आहे, असे जिल्हा प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले. 

या कामासाठी केलेल्या खोदाईची रॉयल्टीसह दंड ठेकेदाराने भरणे अपेक्षित आहे. त्यानुसार ठेकेदार कंपनीच ती रक्कम भरणार आहे. मात्र, सध्या पालिका दोन कोटी रुपये भरेल. 
– विजय शिंदे, अधीक्षक अभियंता, महापालिका