Home गुन्हा पुणे गुन्हेगारांची कुंडली सविस्तर माहितीसह नव्याने तयार

पुणे गुन्हेगारांची कुंडली सविस्तर माहितीसह नव्याने तयार

0

*पुणे गुन्हेगारांची कुंडली सविस्तर माहितीसह नव्याने तयार*

पुणे – दत्तवाडी भागात चोरट्याने एक एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. हे सर्व सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. त्या फुटेजवरून पोलिसांना आरोपीची लगेच ओळख पटली आणि काही वेळात त्याला बेड्या ठोकल्या. हे ‘क्रिप्स’ (क्रिमिनल इनसेंटिव्ह सर्व्हेलन्स प्रोजेक्‍ट) या प्रकल्पामुळे शक्‍य झाले. त्या अंतर्गत शहरातील पोलिस रोज ६० गुन्हेगारांच्या घरी जाऊन त्यांची कुंडली (सविस्तर माहिती) नव्याने तयार करत आहेत. गेल्या ११ महिन्यांत शहरातील १५ हजार गुन्हेगारांना तपासण्यात आले आहे. 

गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी गुन्हेगारांवर मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी ‘क्रिप्स’ प्रकल्प उपयुक्‍त ठरत आहे. पुणे पोलिसांकडे २००३पासून गुन्हे केलेल्या ४२ हजार गुन्हेगारांची माहिती आहे. त्यातील बहुतांश गुन्हेगारांची अद्ययावत माहिती नाही. या प्रकल्पांतर्गत शहरात जबरी चोऱ्या, दरोडा, घरफोडी, साखळी चोरी, मारामारी करणाऱ्यांची घरी जाऊन तपासणी केली जाते. त्यांच्याकडून आधार, पॅन कार्डसह नवा फोटो, सध्या काय करतो, नातेवाइकांची माहिती असलेला अर्ज भरून घेऊन माहिती अद्ययावत केली जाते. पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी सप्टेंबर महिन्यात हा प्रकल्प अंमलात आणला. त्यास नुकतेच ‘फिक्की’कडून ‘स्मार्ट पोलिसिंग’चे पारितोषिक मिळाले आहे.

पोलिसांचे व्हॉट्‌सॲप ग्रुप 
शहरातील पाच झोनमधील ३० पोलिस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केले आहेत. एका पोलिस ठाण्याला दोन याप्रमाणे रोज ६० गुन्हेगार तपासले जातात. आतापर्यंत १५ हजार गुन्हेगार तपासले असून, त्यापैकी सुमारे ८ हजार गुन्हेगार सापडले आहे. काही गावाकडे निघून गेले, तर अनेक जण पत्ता बदलून दुसऱ्या भागात राहायला गेले आहेत. सुमारे १२०० गुन्हेगार राज्यातील विविध कारागृहांत आहेत. 

पुन्हा गुन्हे करण्याचे प्रमाण घटले 
पोलिसांकडे गुन्हेगारांची माहिती अद्ययावत असल्याने पुन्हा गुन्हे करण्याचे प्रमाण घटले आहे. गेल्या ११ महिन्यांत फक्त नऊ गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हे केले आहेत. त्यांना अटक केली आहे. यामध्ये घरफोडी व मारामारी करणारे गुन्हेगार आहेत. आपल्याबद्दल पोलिसांकडे अद्ययावत माहिती आहे, गुन्हा केला की ते लगेच अटक करू शकतात. या मानसिक दबावातून गुन्हेगारीवर नियंत्रण येते. हा ‘क्रिप्स’ या प्रकल्पाचा हेतू आहे, असे अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांनी सांगितले. 

१५ हजारांपैकी निम्मे गुन्हेगार पोलिसांना शोधता आले नाहीत. न सापडणाऱ्या गुन्हेगारांना शोधण्याची जबाबदारी गुन्हे शाखेवर टाकली आहे. दर मंगळवारच्या बैठकीत (टीआरएम) आयुक्तांकडून आढावा घेतला जात असल्याने पोलिसांनाही हे काम प्राधन्याने करावे लागत आहे.

जानेवारी ते २७ ऑगस्टपर्यंत शहरात दाखल गुन्हे 

जबरी चोरी   – १४५
दरोडा – १६
मारामारी १०८
घरफोडी – ३१६
खून   – ५१
खुनाचा प्रयत्न –  ७८