Home ताज्या बातम्या उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून महाराष्ट्र डिफेन्स एक्स्पोच्या पूर्वतयारीचा आढावा

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून महाराष्ट्र डिफेन्स एक्स्पोच्या पूर्वतयारीचा आढावा

0
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून महाराष्ट्र डिफेन्स एक्स्पोच्या पूर्वतयारीचा आढावा

पुणे,दि.८: पुणे इंटरनॅशनल प्रदर्शन आणि कनव्हेन्शन सेंटर यांच्यावतीने १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत मोशी येथे होणाऱ्या महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोच्या पूर्वतयारीचा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आढावा घेतला.

यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, उद्योग संचालनालयाचे आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह,  पीएमआरडीएचे राहूल महिवाल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विपीन शर्मा उपस्थित होते.

उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले की, या प्रदर्शनाला महाराष्ट्रातील लघु व मध्यम उद्योजक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन आयोजनामध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची सर्व विभागांनी दक्षता घ्यावी. प्रदर्शन यशस्वी करणे ही सर्व विभागांची सामूहिक जबाबदारी आहे. या प्रदर्शनामध्ये ४६८ स्टॉल लावण्यात येणार असून आत्तापर्यंत ३०० उद्योजकांनी सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. संरक्षण उत्पादनासाठी महाराष्ट्र एक प्रमुख केंद्र बनवण्यासाठी शासन वचनबद्ध असून या प्रदर्शनामुळे लघु व मध्यम उद्योगांच्या विकासाला चालना मिळेल, असेही मंत्री श्री. सामंत म्हणाले.

उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी प्रदर्शनाच्या ठिकाणी करावयाचे वाहतूक नियमन, वाहनतळ व्यवस्था, प्रवेशद्वार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, हेलिपॅड आदी सुविधांचा आढावा घेऊन संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, आरोग्य, अग्निशमन, महावितरण, एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.

०००