Home ताज्या बातम्या कामगारांचे अधिक प्रमाणात मतदान असलेल्या औद्योगिक आस्थापनांना पुरस्कार देणार – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

कामगारांचे अधिक प्रमाणात मतदान असलेल्या औद्योगिक आस्थापनांना पुरस्कार देणार – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

0
कामगारांचे अधिक प्रमाणात मतदान असलेल्या औद्योगिक आस्थापनांना पुरस्कार देणार – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

पुणे, दि.२३: शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी औद्योगिक आस्थापनांचे सहकार्य महत्त्वाचे असून कामगारांचे अधिक प्रमाणात मतदान असलेल्या औद्योगिक आस्थापनांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल, असे प्रतिपादन अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे औद्योगिक आस्थापनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा करताना ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्वीप समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर, अर्चना पाठारे आदी उपस्थित होते.

श्री. देशपांडे म्हणाले, शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. औद्योगिक आस्थापनांनी मतदान करण्यासाठी कामगारांना प्रोत्साहित करावे. त्यांना मतदार नोंदणी, मतदार यादीतील नाव किंवा पत्त्यातील तपशीलात बदल करणे, मतदार यादीतील नाव वगळणे आदींबाबत माहिती द्यावी. मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी आपल्या आस्थापनेत योग्य नियोजन करावे. लोकसभा निवडणूकीतील अनुभवानुसार त्यात विधानसभा निवडणूकीच्या वेळी आवश्यक बदल करता येईल. निवडणुकीनंतर झालेल्या मतदानाची माहिती द्यावी, त्यानुसार चांगले काम करणाऱ्या औद्योगिक आस्थापनांना पुरस्कार देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी निवडणूक प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि त्यासाठी सूचनादेखील केल्या.

००००