Home ताज्या बातम्या विदर्भातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष मोहीम राबवा – मंत्री संजय राठोड

विदर्भातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष मोहीम राबवा – मंत्री संजय राठोड

0
विदर्भातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष मोहीम राबवा – मंत्री संजय राठोड

मुंबई दि. २६:  माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन हा विदर्भासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून विशेष मोहीम राबवून उत्तम गुणवत्तेची कामे करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.

विदर्भात एकूण अंदाजे ९ हजार २८० माजी मालगुजारी  तलाव आहेत. सन २०२३-२४ मध्ये विदर्भातील व मराठवाड्यातील १ हजार ६४९ माजी मालगुजारी तलावांचे पुनरूज्जीवन व दुरूस्ती प्रस्तावित आहे. सध्या प्रस्तावित तीन वर्षाच्या नियोजनानुसार २ हजार ३९८ माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीबाबत नियोजन करण्याचे निश्च‍ित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात १ हजार १०६ प्रस्तावास मान्यता देणेबाबत मंत्री श्री. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनिल चव्हाण, प्रत्येक जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य अभियंता, जिल्हा जलसंधारण अधिकारी (जि.प.) उपस्थित होते.

मंत्री श्री. राठोड यांनी मालगुजारी तलावांच्या कामाबाबत आढावा घेऊन गोंदिया जिल्ह्यातील ४४४ तलावांच्या पुनरुज्जीवन व योजनांची दुरुस्तीसाठी ५७.६१ कोटी, भंडारासाठी ८५ तलावांच्या दुरूस्तीसाठी २७.०५ कोटी, चंद्रपूर येथील ४६० तलावांच्या दुरूस्तीसाठी १२०. ३२ कोटी, व गडचिरोली जिल्ह्यातील १०७ तलावांसाठी २९.०५ कोटींच्या कामांस मान्यता देण्यात आल्याचे सांगितले. मान्यता देण्यात आलेल्या ११०६ तलावांच्या पुनरूज्जीवन व दुरूस्तीची कामे गतीने आणि उत्तम गुणवत्तेने करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी दिल्या.

यवतमाळ जिल्ह्यात ३१ तलावांची दुरुस्ती करण्याचे नियोजित असून, तातडीने या संदर्भातील सुधारित प्रस्ताव पाठवावा. या कामानंतर यवतमाळमध्ये अंदाजे ६०० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होईल. नागपूर, नांदेड व यवतमाळ जिल्ह्याचा सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा. या जिल्‍ह्यातील तलावांच्या कामासही गती देण्यात यावी. संबंधित सर्व कामे दर्जेदार होतील यासाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे. अनुभवी व्यक्तीमार्फत उत्तम दर्जाची व्हावीत, यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मंत्री श्री. राठोड यांनी दिल्या.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/