Home ताज्या बातम्या कोकणातील बंदरे विकासाची कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत – मंत्री संजय बनसोडे – महासंवाद

कोकणातील बंदरे विकासाची कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत – मंत्री संजय बनसोडे – महासंवाद

0
कोकणातील बंदरे विकासाची कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत – मंत्री संजय बनसोडे – महासंवाद

मुंबई, दि. 27 : कोकणचा सर्वांगिण विकास होण्यासाठी कोकणातील बंदरांचा विकास होणे गरजेचे आहे. या ठिकाणी पायाभूत सोयी – सुविधांची विकास कामे गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी बंदरे विकासाची कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत, असे निर्देश बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

कोकणातील विविध बंदर विकासाबाबत आढावा बैठक मंत्री श्री. बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात झाली. बैठकीस खासदार सुनील तटकरे, बंदरे विभागाचे प्रधान सचिव संजय सेठी, सहसचिव सिद्धार्थ खरात, मुख्य अभियंता श्री. गोसावी आदींसह अधिकारी उपस्थित होते.

वाल्मिकी नगर जेट्टीचे नूतनीकरण करण्याच्या सूचना देत मंत्री श्री. बनसोडे म्हणाले, येथील रस्त्याचे काम प्राधान्याने पूर्ण करावे. जंजिरा येथे दोन रस्ते करून पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यात. आणखी एक रस्ता झाल्यास या भागाकडे पर्यटकांचा ओढा वाढेल. पर्यावरणाला कुठलीही हानी पोहचणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी पर्यावरण विभागाची मान्यता घेवून कामे करावीत.

बंदरांमधील विकास कामांचे नकाशे तातडीने संबंधित यंत्रणेकडून मंजूर करून ऑनलाईन अपलोड करावीत. बागमांडला जेट्टीजवळ पार्किंग व इतर सुविधा देण्यात याव्यात. शेखाडी जेट्टीचे मजबूतीकरणाचे काम विहित कालावधीत पूर्ण करावे. आरावी व कोंडबील या जुन्या जेट्टी असून त्यांचे नूतनीकरण करण्यात यावे, असेही मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी बंदर विकासाबाबत विविध मुद्दे उपस्थित केले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

००००

निलेश तायडे/विसंअ/