Home बातम्या ऐतिहासिक छोट्या उपसा सिंचन योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभदायक – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

छोट्या उपसा सिंचन योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभदायक – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

0
छोट्या उपसा सिंचन योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभदायक – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक 04 मार्च 2024 (जिमाका वृत्त) : जिल्ह्यातील १८ धरणांवर १८ लघु स्वरूपाच्या उपसा सिंचन योजना जिल्हा परिषदेच्या सुरू करणार असून अशा छोट्या उपसा सिंचन योजना शेतकऱ्यांना मोठ्या लाभदायक ठरतील, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला आहे.

ते आज नंदुरबार तालुक्यातील शिरवाडे लघु उपसा सिंचन योजनेच्या भूमीपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी सरपंच रामसिंग नाईक (शिरवाडे) कोयऱ्या वळवी(वडझाकन), उपसरपंच संजय गावित, कार्यकारी अभियंता, उप अभियंता वाय. एम. गायकवाड, टी. के. ठाकरे, कार्यकारी अधिकारी सुरेश भापकर, पंचक्रोशीतील अधिकारी, पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, शिरवाडे उपसा सिंचन योजनेमुळे सुमारे १०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. धरणाच्या खालच्या बाजूस पाटामुळे पाणी पोहचते, या उपसा सिंचन योजना धरणांच्या वरच्या बाजूस जाणीवपूर्वक निर्माण केल्यामुळे धरणाच्या वरच्या बाजूस कोरड शेतजमिनींनाही त्याचा लाभ होणार आहे.

ते पुढे म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यात लहान, मोठ्या धरणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय जल्ह्यातून तापी व नर्मदा या मोठ्या नद्या वाहतात. परंतु नंदुरबार जिह्यातील बऱ्याच भागात सिंचन सुविधांचा अभाव आहे.  शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नव्हते. नंदुरबार जिल्ह्यातील १००% लहान मोठ्या धरणातुन व तापी नर्मदा नदी लगत ज्या ठिकाणी शक्य आहे. त्याठिकाणी लहान मोठ्या उपसा सिंचन योजना, साठवण बंधारे, सी.एन.बी. च्या माध्यमातुन मोफत सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणे हे स्वप्न होते. ते आज साकार होतांना दिसत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनाची सुरुवात शिरवाडे उपसा सिंचन योजनेपासुन होत आहे. आस्था फाऊंडेशन नंदुरबार या सेवा भावी संस्थेच्या पुढाकाराने शिरवाडे आदिवासी सहकारी उपसा सिंचन संस्था, शिरवाडे ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातुन इतर देखील उपसा योजनांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत. लवकरच नंदुरबार जिल्हयातील सर्व लहान मोठे धरणे तापी व नर्मदा नदी वरुन इतर शेतकऱ्यांना उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातुन सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

थोडक्यात महत्वाचे…

शिरवाडे आदिवासी सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातुन शिरवाडे गावातील ४७ लाभार्थ्यांना एकुण ४९.९ हेक्टर क्षेत्रास, वडझाकण गावातील ३९ लाभार्थींना एकुण ३७.९६ हेक्टर क्षेत्रास व रनाळे गावातील ६ लाभार्थींना एकुण १२ हेक्टर क्षेत्रावरील ९२ लाभार्थींच्या एकुण ९९.८६ हे. क्षेत्रास गावालगत असेलेल्या शिरवाडे लघुपाठ तलावातील उपसा सिंचनाद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेसाठी एकुण ३.२० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या योजनेमुळे धरणातील पाण्यापासुन वंचित असलेल्या शेतकऱ्यांना जे फक्त पावसाच्या पाण्यावरती अवलंबुन होते त्यांना बारमाही पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या  उत्पन्नात वाढ होऊन खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनात समृद्धी येणार आहे.

 

0000000000