Home ताज्या बातम्या खानापूर मतदारसंघातील विकास कामांना गती द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

खानापूर मतदारसंघातील विकास कामांना गती द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
खानापूर मतदारसंघातील विकास कामांना गती द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १२ : खानापूर मतदारसंघाच्या विकासासाठी दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी खूप संघर्ष केला आहे. त्यांच्या पश्चातही या मतदार संघातील विकास कामांना प्राधान्याने गती दिली पाहिजे, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामे, सुविधांच्या आढाव्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज बैठक झाली.

बैठकीस उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास बाबर, अमोल बाबर तसेच परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार, परिवहन विभाग आयुक्त विवेक भीमनवार, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, दिवंगत आमदार बाबर यांचे आयुष्य संघर्षमय राहिले आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघातील विकास कामांसाठी सातत्यपूर्णरित्या पाठपुरावा केला आहे. त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांना आपल्याला गती द्यावी लागेल. त्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आणि सकारात्मक दृष्ट्या कार्यवाही करावी.’

विटा येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याबाबत सकारात्मक आहोत. दरम्यान हे कार्यालय सुरु होईपर्यंत परिवहन खात्यातर्फे आयोजित केला जाणाऱ्या वाहन नोंदणीसह, विविध कामांसाठीची शिबिरांची संख्या दुपटीने वाढवावी. या ठिकाणी नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

एस.टी. महामंडळाच्या विटा, खानापूर, आटपाडी, खरसुंडी येथील आगार व बसस्थानकांच्या सुविधांबाबतही आढावा घेण्यात आला. या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. विटा येथील आगार आणि बसस्थानकांमधील सुविधा अद्ययावत करण्यात याव्यात. याठिकाणची कामे दर्जेदार आणि वेळेत व्हावीत, अशा सूचना देण्यात आल्या. हातनूर येथील ग्रामीण रुग्णालय, तसेच या मतदार संघातील विविध गावांतील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राबाबतचा आढावा घेण्यात आला. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम योजनेतंर्गत विविध ग्रामपंचातींचे प्रस्ताव, तसेच जलसंधारणाची कामे याबाबतही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले.

००००