Home ताज्या बातम्या राज्यात मतदारांच्या संख्येत 10 लाखाने वाढ; सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यातील

राज्यात मतदारांच्या संख्येत 10 लाखाने वाढ; सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यातील

0

राज्यात मतदारांच्या संख्येत 10 लाखाने वाढ; सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यातील*

राज्यातील मतदारांच्या संख्येत तब्बल दहा लाखांनी वाढ झाली आहे. ताज्या नोंदणीनुसार महाराष्ट्रात मतदारांची एकूण संख्या 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 इतकी झाली आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे 76 लाख 86 हजार 636 मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. त्याखालोखाल मुंबई उपनगर जिह्यातील मतदारांची संख्या 72 लाख 26 हजार 826 इतकी झाली आहे.

राज्यातील चौदाव्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून राज्यभरात मतदार नोंदणी आणि पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. 15 जुलै ते 31 ऑगस्ट 2019 या काळात राज्यभरात हा कार्यक्रम सुरू होता. या दीड महिन्यात सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदारांची संख्या दहा लाखांनी वाढली. लोकसभेला जवळपास 8 कोटी 84 लाख इतक्या मतदारांची नोंद होती.

*मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार* 
मुंबई शहर जिल्ह्यात 25 लाख 4 हजार 367, ठाणे जिल्ह्यात 63 लाख 29 हजार 385, पालघर जिल्ह्यात 19 लाख 36 हजार 141, रायगडमध्ये 22 लाख 65 हजार 478, नाशिकमध्ये 45 लाख 24 हजार 663, नगरमध्ये 34 लाख 68 हजार 522, सोलापुरात 34 लाख 21 हजार 324, सातार्‍यात 25 लाख 21 हजार 165, कोल्हापुरात 30 लाख 90 हजार 660, सांगलीत 23 लाख 74 हजार 374, रत्नागिरीत 13 लाख 8 हजार 800 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6 लाख 69 हजार 623 इतके मतदार आहेत.

राज्यातील मतदार

पुरुष   4 कोटी 67 लाख 37 हजार 841

स्त्री     4 कोटी 27 लाख 5 हजार 777

तृतीयपंथी    2 हजार 593

एकूण   8 कोटी 94 लाख 46 हजार 211

*ईव्हीएमला अधिक सुरक्षा*

या वर्षी ईव्हीएमच्या स्ट्राँगरूमला एक अधिकस्तर सुरक्षा व्यवस्था देण्यासाठी अतिरिक्त सुमारे 400 कंपन्यांची मागणी केल्याबाबत माहिती यावेळी देण्यात आली.

*विधानसभा निवडणुकीची तयारी*

विधानसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वय अधिकार्‍यांची आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, परिवहन आयक्त शेखर चन्ने, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे–वर्मा याही उपस्थित होत्या. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मनुष्यबळ, सुरक्षा व्यवस्थेच्या नियोजनाबाबत माहिती दिली. निवडणुकीदरम्यान बेनामी रोकड वाहतूक जप्ती, अवैध मद्यवाहतुकीविरुद्ध मोहीम, नक्षलग्रस्त भागात अधिकची सुरक्षा व्यवस्था, तपासणी नाके आदींबाबत आढावा घेण्यात आली.