Home ताज्या बातम्या टोल फ्री क्रमांक १९५० मुळे नागरिकांचे शंका समाधान गतीने

टोल फ्री क्रमांक १९५० मुळे नागरिकांचे शंका समाधान गतीने

0
टोल फ्री क्रमांक १९५० मुळे नागरिकांचे शंका समाधान गतीने

छत्रपती संभाजीनगर, दि. (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने नागरिकांना एकूणच मतदान करण्याबाबत असणाऱ्या विविध शंका- तक्रारींचे निवारण करण्यासाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक मोलाची मदत करणारा ठरला आहे. दि.१६ मार्च रोजी हा क्रमांक स्थापित करण्यात आला असून आतापर्यंत ५१४ शंका तक्रारी दूरध्वनीद्वारे तर १५ तक्रारी प्रत्यक्ष दाखल करण्यात आल्याची माहिती मतदार मदत व तक्रार निवारण कक्षाचे नोडल अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच मतदार मदत व तक्रार निवारण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आला.  मतदारांच्या सोईसाठी  १९५० हा टोल फ्री दुरध्वनी क्रमांक स्थापित करण्यात आला आहे. हा कक्ष स्थापित झाल्यापासून आजतागायत या क्रमांकावर ५१४ तक्रारी – विचारणा इ. प्राप्त झाले. त्या सर्वांचे निराकरण करण्यात आले. या शिवाय १५ जणांनी प्रत्यक्ष कक्षात दाखल होऊन आपल्या विचारणा / तक्रारी केल्या आहेत. त्यांचेही निराकरण करण्यात आले. या शिवाय नागरिक भारत निवडणूक आयोगाच्या  National Grievance Service Portal (NGSP) या पोर्टलवरही नागरिक आपल्या निवडणूक विषयक शंका विचारु शकतात, समस्या व तक्रारी नोंदवू शकतात. जिल्ह्यातून आतापर्यंत १२१ तक्रारींची नोंद होऊन त्यांचेही निरसन करण्यात आले, अशी माहिती प्रकाश पाटील यांनी दिली आहे.

दिवसभरात या कक्षात ३० ते ४० मतदार १९५० या क्रमांकावर संपर्क साधतात. जश जशी निवडणूक प्रक्रिया जवळ येईल तसा हा आकडा वाढेल,असेही श्री. पाटील यांनी सांगितले.  नवीन मतदान नोंदणी कशी करावी? कोणता अर्ज भरावा?, मतदान कार्ड दुरुस्तीबाबत,  दिव्यांग व्यक्तिंचे मतदान, त्यांच्यासाठी देण्यात आलेल्या सुविधांची उपलब्धता अशा विविध कारणांसाठी या दुरध्वनीवर विचारणा होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके  यांच्या मार्गदर्शनात नोडल अधिकारी प्रकाश पाटील व त्यांची टीम हे काम अहोरात्र (२४X७)  करीत आहे.