Home ताज्या बातम्या रिक्षात विसरलेली बॅग रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे केली परत; बॅगमध्ये 20 हजार रुपयांची रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे

रिक्षात विसरलेली बॅग रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे केली परत; बॅगमध्ये 20 हजार रुपयांची रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे

0

रिक्षात विसरलेली बॅग रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे केली परत; बॅगमध्ये 20 हजार रुपयांची रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे

प्रवासादरम्यान रिक्षात विसरलेली बॅग रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे परत केली. त्याने परत केलेल्या बॅगमध्ये 20 हजार रुपयांची रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे होती. वडिलांच्या आजारपणासाठी जमा केलेली पैसे हरवून पुन्हा सापडल्याने प्रवासी महिलेच्या आनंदाला पारावर उरला नाही. निगडी पोलिसांनी प्रामाणिक रिक्षाचालकाचा सत्कार केला.

महेंद्र निवृत्ती अरवडे (वय 38, रा. साईनाथनगर निगडी) असे प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. तर प्राजक्ता दिलीप गोळे (रा. जुना आग्रारोड, गोकुळनगर, ठाणे पश्चिम) असे प्रवासी महिलेचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राजक्ता यांच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यांना तात्काळ निगडी येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले.

याबाबत प्राजक्ता यांना माहिती देण्यात आली. प्राजक्ता यांच्या वडिलांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडून जमेल तेवढी रक्कम जमा केली. एकूण 20 हजार रुपयांची रक्कम वडिलांच्या आजारपणासाठी त्या मुंबईहुन पुण्याला घेऊन आल्या. चिंचवड येथे उतरल्यानंतर त्या 3 सप्टेंबर रोजी चिंचवड ते निगडी खासगी रिक्षातून आल्या.

सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास प्राजक्ता निगडी मधील टिळक चौकात उतरल्या. वडिलांना बघायला जाण्याच्या घाईत त्यांची पैशांची बॅग रिक्षातच राहिली. ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ टिळक चौकात येऊन पोलिसांना याबाबत माहिती दिली.

टिळक चौक येथे वाहनांवर कारवाई करीत असलेले पोलीस हवालदार दिघे व टिम नंबर आठच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रिक्षाचा शोध घेतला. मात्र, पोलिसांना रिक्षाचा पत्ता लागला नाही. त्यामुळे याबाबत निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

शुक्रवारी (दि. 6) रिक्षा (एम एच 14 / जी सी 2712) चालक महेंद्र अरवडे यांनी प्राधिकरण पोलीस चौकीत त्यांच्या रिक्षात राहिलेली पैशांची बॅग आणि कागदपत्रे आणून दिली. पैशांची बॅग सापडल्याची माहिती पोलिसांनी प्राजक्ता यांना दिली. पैशांची बॅग परत मिळाल्याचे ऐकून प्राजक्ता यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यांनी त्यांचे बंधू सुभाष गोळे यांना याबाबत सांगितले. सुभाष गोळे यांना प्राजक्ता यांची हरवलेली पैशांची बॅग आणि कागदपत्रे परत करण्यात आली.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक घाडगे, पोलीस कर्मचारी दिघे, बेबले, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत तरडे, दशरथ गोळे व विजय गोळे आदी उपस्थित होते.

प्रामाणिकपणे बॅग परत केल्याबद्दल निगडी पोलिसांनी रिक्षाचालक महेंद्र अरवडे यांचा पुष्पगुच्छ व पेढे देऊन सत्कार केला. पोलिसांनी शाबासकीची थाप दिल्याने महेंद्र यांनी आनंद व्यक्त केला.