कामगार युनियन तयार करण्यासाठी रांजणगाव येथील एलजी कंपनीमधील कामगारांना धमकावले
‘हिंद कामगार संघटना’ या नावाने कामगार युनियन तयार करण्यासाठी रांजणगाव येथील एलजी कंपनीमधील कामगारांना धमकावले. कामगारांवर दबाव आणून त्यांच्याकडून संघटनेत येण्यासाठी बारा जणांनी मिळून कैलास कदम याच्या सांगण्यावरून जबरदस्तीने प्रत्येक कामगाराला दहा हजार रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कंपनीतील कामगारांवर भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने या गुन्ह्यातील आरोपींवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे.
चारूदत्त मनोहर वैदय (वय 39, रा. शिक्रापूर, ता. शिरूर), मनोजकुमार कतवारू पाल (वय 36, रा. काळुबाई नगर, वाघोली, ता. हवेली), जीवन जयंत डंके (वय 38, रा. महाबळेश्वर नग, साईनाथ कॉलनी, शिक्रापूर), विजय विठ्ठल मोकळे (वय 39, रा. दुबेनगर, वाघोली, ता. हवेली), किशोर संतोष पाटील (वय 39, रा. पेरणे फाटा, ता. हवेली), निलेश रमेश शेलार (वय 37, रा. गणेश नगर अव्हाळवाडी रोड, वाघोली, ता. हवेली), सर्जेराव अंबाजी खरात (वय 40, रा. एस टी कॉलनी, वाघोली, ता. हवेली), संतोष तुळशीराम खेडकर (वय 39, रा. दिनकर पठारवस्ती, चंदननगर, ता. हेवली), कैलास प्रेमलाल पटले (वय 35, रा. रायसोनी कॉलेज रोड, वाघोली, ता. हवेली), संदिप कुष्णराव देशमुख (वय 38, रा. तुळजा भवानी नगर, खराडी), शिवाजी गुलाबराव राठोड (वय 34, रा. मलठन फाटा, शिक्रापूर, ता. शिरूर), अशोक देवप्पा धाडकर (वय 37, रा. पठारे ठुबे नगर, खराडी) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारूदत्त वैदय, संदीप देशमुख, शिवाजी राठोड, मनोजकुमार पाल, जिवन डंके, विजय मोकले, किशोर पाटील, निलेश शेलार, सर्जेराव खरात, संतोष खेडकर, अशोक धाडकर, कैलास पटले यांनी रांजणगाव एमआयडीसी येथे असलेल्या एलजी कंपनीतील कामगारांना कंपनीत ‘हिंद कामगार संघटना’ या नावाने युनियन तयार करण्याचा आग्रह धरला. युनियनचे अध्यक्ष कैलास कदम (रा. खराळवाडी, पिंपरी) यांच्या सांगण्यावरून प्रत्येक कामगाराकडून युनियनमध्ये येण्यासाठी 10 हजार रुपयांची मागणी केली. ‘युनियनमध्ये जे येणार नाहीत, त्यांना आम्ही पाहून घेऊ’ अशी धमकी दिली. याप्रकरणी जया मनोज पवार (रा. वडगाव शेरी, पुणे) यांनी रांजणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांच्यासह कंपनीतील कामगार कलिम बाबुलाल शेख, निसार अहमद सहमद अली, अमोल शिवाजी ठाणगे, इंद्रमनि लालनसिंग चंदेल, पंकज श्रीराजबलम मिश्रा यांनाही आरोपींनी दहा हजार रुपयांची मागणी केली. यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आरोपींनी संघटीत गुन्हेगारांची टोळी तयार केली. या टोळीने टोळीप्रमुख कैलास कदम याच्या नेतृत्वाखाली वरील गुन्हा केल्याचे पोलीस तपासामध्ये निदर्शनास आले. त्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला. प्रस्तावाची पडताळणी करून विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. दौंड विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या भारती तपास करीत आहेत.