Home ताज्या बातम्या सार्वजनिक मंडळांकडून जय्यत तयारी सुरू; विद्युत रोषणाईसह फुलांच्या सजावटीवर भर

सार्वजनिक मंडळांकडून जय्यत तयारी सुरू; विद्युत रोषणाईसह फुलांच्या सजावटीवर भर

0

सार्वजनिक मंडळांकडून जय्यत तयारी सुरू; विद्युत रोषणाईसह फुलांच्या सजावटीवर भर

पुणे – राज्यभरातील गणेशभक्तांचे लक्ष लागून राहिलेल्या पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (ता. १२) अनंत चतुर्दशीला होत असताना लाडक्‍या बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यासाठी शहरातील गणेश मंडळे तयारीला लागली आहेत. मानाच्या गणपतींसह इतर मंडळांनी विद्युत रोषणाई, फुलांची सजावट करून आकर्षक रथ तयार केले आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक संदेश देणारी पथके मिरवणुकीत सहभागी होऊन विविध विषयांवर जनजागृती करणार आहेत.

कसबा (मानाचा पहिला)
ग्रामदैवत कसबा गणपतीची मिरवणूक महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा येथून गुरुवारी (ता. १२) सकाळी साडेदहा वाजता महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत आरती होऊन सुरू होईल. यामध्ये रमणबाग प्रशाला, रुद्रगर्जना व कलावंत ही तीन ढोलताशा पथके तसेच, मुलींचे दोर मल्लखांब पथक व रोटरी क्‍लब यांचाही मिरवणुकीत सहभाग असेल. 

तांबडी जोगेश्‍वरी (मानाचा दुसरा)
ग्रामदेवता तांबडी जोगेश्‍वरी मंडळाच्या मिरवणुकीत सर्वांत पुढे सतीश आढाव यांचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बॅंड, शिवमुद्रा, ताल व समर्थ पथकांचे ढोलवादन होणार आहे. ‘विष्णूनाद’चे कार्यकर्ते शंखनाद करणार आहेत. पारंपरिक पोषाखात अश्‍वारूढ कार्यकर्ते आणि महिलाही पारंपरिक वेशात सहभागी होणार आहेत. चांदीच्या पालखीतून ‘श्रीं’ची मिरवणूक काढली जाणार आहे.

गुुरुजी तालीम (मानाचा तिसरा)
लक्ष्मी रस्त्यावरील गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीच्या मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्‍वराज बॅंड, नादब्रह्म, गर्जना या पथकांचे ढोलताशा वादन होणार आहे. ‘श्रीं’च्या मूर्तीची मिरवणूक फुलांनी आकर्षक सजावट केलेल्या ‘हरे कृष्णा’ रथातून निघणार आहे. त्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.

तुळशीबाग (मानाचा चौथा)
तुळशीबाग मंडळाने २४ फूट उंचीचा फुलांची सजावट केलेला मयूर रथ तयार केला आहे. त्यामध्ये १२ फूट उंचीची कमान असू, त्यात गणपतीची मूर्ती असणार आहे. मिरवणुकीच्या सुरवातीला लोणकर बंधूंचा नगारा असणार आहे. गजलक्ष्मी, हिंद तरुण मंडळ, स्वरूपवर्धिनी ही तीन ढोतलाशा पथके वादन करणार आहेत. अवयवदान व ‘ओम नमो परिवार’ या संस्थांच्या महिलांचे पथक सामाजिक संदेश देणार आहे. 

केसरीवाडा (मानाचा पाचवा)
केसरीवाडा गणपती विसर्जन मिरवणुकीत सर्वांत पुढे बिडवे बंधूंचे नगारावादन, त्यानंतर श्रीराम व शिवमुद्रा ढोलताशा पथकाचे वादन होणार आहे. लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाला १२५ वर्षे पूर्ण होत असल्याने इतिहासप्रेमी मंडळाचा जिवंत देखावा हे आकर्षण असेल. रंगीबिरंगी फुलांच्या सजावटीच्या मेघडंबरी रथात ‘श्रीं’ची मूर्ती विरामान होणार आहे. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीत १ लाख २१ हजार एलईडी बल्बचा वापर करून करून मुद्‌गल पुराणालातील गणपतीचा सहावा अवतार असलेल्या ‘विकट विनायक’ या संकल्पनेवर आकर्षक रथ तयार केला आहे. प्रभात ब्रास ब्रॅंड, दरबार ब्रास बॅंड, स्वरूपवर्धिनी ढोलताशा पथके, लेझीम पथके, सनई चौघडा वादन असणार आहे. असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

अखिल मंडई गणपती 
शारदा गजानन मूर्तीची मिरवणूक ३२ फूट शांती रथातून निघणार आहे. भगवान महावीर यांच्या आईला पडलेली १४ स्वप्ने या रथातून साकारली आहेत. रथावर एलईडी दिव्यांची सजावट आहे. शिवगर्जना, रमणबाग ढोलताशा पथके, सनईवादक खळदकर बंधू यांचा मिरवणुकीत समावेश असेल.

श्रीमंत भाऊ रंगारी
बुधवार पेठेतील श्रीमंत भाऊ रंगारी गणपतीची विसर्जन  मिरवणूक १२८ वर्षे जुन्या स्वातंत्र्यपूर्व काळातील रथातून पारंपरिक पद्धतीने काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत सर्वांत पुढे आढाव बंधूंचे नगारावादन होणार आहे. रथाच्या समोर युवावाद्य, नादब्रह्म व श्रीराम ढोलताशा पथकांचे वादन होईल.

हुतात्मा बाबू गेनू मंडळ
मंडईतील या प्रसिद्ध गणपतीची मिरवणूक फुले व विद्युत रोषणाईने सजविलेल्या मयूर रथातून काढली जाणार आहे. गजलक्ष्मी, शिवतेज, रुद्रगर्जना ही पथके मिरवणुकीत वादन करणार आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यासाठी तयारी केली आहे.