मुंबई, दि. 23 :- सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करुन विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता यावे यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जातील, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
मुंबईतील सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सुरु असलेल्या संत मीराबाई मुलींचे शासकीय वसतिगृह वरळी 116, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह वरळी 116, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह वरळी 118 या वसतिगृहांना सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट यांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदिप कांबळे, समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, सहाय्यक आयुक्त मुंबई शहर, उज्ज्वला सपकाळे, सहाय्यक आयुक्त मुंबई उपनगर प्रसाद खैरनार उपस्थित होते.
वरळी येथील शासकीय वसतिगृहाच्या इमारतीचा पुर्नविकास करताना विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी 200 ते 250 चौ.फूट इतकी जागा प्रत्येक खोलीत उपलब्ध करुन देण्यात येईल, जेणेकरुन विद्यार्थी पुरेशा जागेत राहू शकतील. तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या कॉट, गाद्या व कपाटे, अद्ययावत कॉम्प्युटर, स्पर्धा परिक्षेची अद्ययावत पुस्तके उपलब्ध करुन देण्यात येतील. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या निर्वाह भत्त्यामध्ये वाढ करण्यात येईल. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी सुद्धा सामाजिक न्याय विभागातर्फे विशेष प्रयत्न केले जातील, असेही श्री. शिरसाट यांनी सांगितले.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी श्री. शिरसाट यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून श्री.शिरसाट यांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक न्याय मंत्र्यांच्या वसतिगृहातील अचानक भेटीमुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
००००
शैलजा पाटील/विसंअ/