
मुंबई, दि. 24 : शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी जवाहर बालभवन अतिशय मोलाची भूमिका बजावत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बालभवनसारखे केंद्र उभारण्याचा प्रयत्न केला जाईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.
मुंबईतील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनचा 73 वा वर्धापन दिन सोहळा राज्यमंत्री डॉ.भोयर यांच्या उपस्थितीत सोमवारी साजरा झाला. यावेळी त्यांच्यासमवेत बालभवनचे अशासकीय सदस्य प्रशांत भामरे, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, जवाहर बालभवनच्या संचालक नीता पाटील, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आणि विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मित असणे हा शालेय शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. यासाठी शिक्षण आनंददायी असण्यावर राज्य शासनाचा भर आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 73 वर्षांपूर्वी स्थापन झालेले जवाहर बालभवन हेच कार्य अतिशय उत्तम रितीने पार पाडीत असून विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, खेळ, विविध छंद यामध्ये मिळविलेले नैपुण्य पाहता आणि याद्वारे त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे स्मित पाहता ही इमारत उभारण्यामागील उद्देश सफल झाल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच आपली आवड जोपासता यावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बालभवनसारखे केंद्र उभारण्याचा आपला प्रयत्न राहील, असे ते म्हणाले.
राज्यमंत्री डॉ.भोयर यांच्या हस्ते बालभवनच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी यावेळी भरतनाट्यम, बालगीत, आदिवासी कोरकू नृत्य आदी कलाविष्कार सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
बालभवनच्या संचालक नीता पाटील यांनी प्रास्ताविकाद्वारे बालभवनच्या स्थापनेचा उद्देश सांगून आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे हे ब्रीद घेऊन मागील 73 वर्षे जवाहर बालभवन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती दिली. वर्षभर राबविण्यात येत असलेले विविध छंद शिबीर, गायन, नृत्य प्रशिक्षण, कार्यशाळा आदी विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील अंगभूत कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणारे हे मुक्तांगण असल्याचे त्यांनी सांगितले.
00000
बी.सी.झंवर/ वि.सं.अ/