जळगाव विद्युत क्रांती – भविष्य उजळवणारी ऊर्जा नव चक्राची गती! – महासंवाद

जळगाव विद्युत क्रांती – भविष्य उजळवणारी ऊर्जा नव चक्राची गती! – महासंवाद
- Advertisement -

जळगाव विद्युत क्रांती – भविष्य उजळवणारी ऊर्जा नव चक्राची गती! – महासंवाद

ऊर्जा ही कोणत्याही प्रदेशाच्या विकासाची मुख्य धुरा आहे. जळगाव जिल्हा आता केवळ केळी उत्पादनासाठीच नव्हे, तर ऊर्जाक्षेत्रातील क्रांतिकारी बदलांसाठीही ओळखला जात आहे. प्रगत तंत्रज्ञान, नव्या ऊर्जा प्रकल्पांचे नियोजन, वीज वितरण सुधारणा आणि सौरऊर्जेच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रकल्पांमुळे जळगाव भविष्यात महाराष्ट्राच्या ऊर्जाधारी जिल्ह्यांपैकी एक ठरणार आहे. त्यासंदर्भात घेतलेला आढावा…!!

▪️दीपनगर भुसावळ थर्मल पॉवर प्लांट – विद्युत उत्पादनाचा मजबूत कणा 

जळगाव जिल्ह्यातील वीज निर्मितीचा कणा म्हणजे दीपनगर, भुसावळ थर्मल पॉवर प्लांट. हे राज्यातील प्रमुख थर्मल पावर (तापीय) वीज प्रकल्पांपैकी एक असून, येथे विद्यमान 1210 मेगावॅट क्षमतेचे वीज उत्पादन सुरू आहे.

✅ सध्याची उत्पादन क्षमता:

दोन युनिट्स प्रत्येकी 500 मेगावॅट

एक युनिट 210 मेगावॅट

✅ वाढीव क्षमता:

लवकरच 660 मेगावॅट क्षमतेचे चौथे युनिट कार्यान्वित होणार आहे.

सर्व परवानग्या आणि चाचण्या पूर्ण होताच उत्पादन सुरू होईल. हा प्रकल्प केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

▪️जळगाव – सौरऊर्जेच्या दिशेने मोठे पाऊल!*

जळगावचे ऊन हे पूर्ण राज्यात किती ‘ताप’ ट आहे ही सांगण्याची गरज नाही. आता या त्रासदायक तापमानाचा फायदा घेतला जातो आहे. जिल्हा प्रशासनाने यात आघाडी घेतली असून जिल्ह्यातील अनेक जागा सौरऊर्जा प्रकल्पाला उपलब्ध करून दिल्या आहेत.

सौरऊर्जा हे भविष्यातील स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेचे सर्वात प्रभावी साधन आहे. जळगावमध्ये मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जा निर्मितीला चालना मिळत असून, भविष्यात हा जिल्हा सौरऊर्जा हब म्हणून विकसित होण्याच्या मार्गावर आहे.

3900 एकर जमीन सौर प्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिली जाणार असून त्यातून 900 मेगावॅट नवीन सौरऊर्जा निर्मिती केली जाईल एवढी क्षमता आहे. 328 मेगावॅट प्रकल्प सध्या बांधकामाधीन आहे तर 20 मेगावॅट आधीच कार्यान्वित झाला आहे. कृषी आणि घरगुती पातळीवर सौर पंप व छप्परावरील सौर पॅनेल द्वारे अतिरिक्त ऊर्जा निर्मिती होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार सौरऊर्जा वापर प्रोत्साहन योजनेला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत असून विद्युत प्रसारण आणि वितरणात मोठ्या सुधारणा करण्यात येत असून त्यामुळे वीज उत्पादनाबरोबरच तिचे प्रसारण आणि वितरण सुयोग्य असणे आवश्यक आहे. म्हणूनच जळगाव जिल्ह्यात महत्त्वपूर्ण सुधारणा पुढील प्रमाणे राबवल्या जात आहेत.

▪️181 उपस्थानके – एकूण क्षमता 1790 मेगावॅट🔹 RDSS योजनेअंतर्गत सुधारणा:

800 नवीन ट्रान्सफॉर्मर्स बसवले जात आहेत.कृषी क्षेत्रासाठी फीडर विभाजनाचे काम प्रगतीपथावर.

43 नवीन किंवा अद्ययावत उपस्थानके – 300 मेगावॅट अतिरिक्त क्षमता निर्माण होणार. “वन नेशन, वन ग्रिड” – अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करणारी योजना

यामुळे जळगाव जिल्ह्याचा वीज पुरवठा अधिक सक्षम आणि स्थिर होणार आहे.

वीज चोरी आणि अनधिकृत टॅपिंग – मोठे नुकसान!

वीज चोरीमुळे जळगाव जिल्ह्यात दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.

40,000 वितरण ट्रान्सफॉर्मर्सपैकी 20% ट्रान्सफॉर्मर्स ओव्हरलोड होतात. गेल्या काही वर्षांत 1400 ट्रान्सफॉर्मर्स जळाले, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले.

✅ प्रशासनाची नागरिकांना विनंती: ✔ आपल्या भागातील अवैध वीज जोडण्यांची माहिती प्रशासनाला द्या. ✔ वीज चोरी रोखण्यासाठी सहकार्य करा आणि प्रामाणिक वीज वापरास चालना द्या.

विद्युत पुरवठा आणि मागणी – भविष्याचा वेध

सध्या जळगाव जिल्ह्यातील वीज मागणी 1074 मेगावॅट आहे. उन्हाळ्यात ही मागणी 1408 मेगावॅट पर्यंत वाढते. नियोजित सुधारणा आणि नवीन प्रकल्पांमुळे 682 मेगावॅट अतिरिक्त क्षमता निर्माण होईल. यामुळे जळगाव जिल्हा ऊर्जा निर्यात करणाऱ्या प्रदेशांपैकी एक बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे!

नवी संधी – उद्योग, गुंतवणूक आणि विकास!

ऊर्जा हा उद्योग आणि व्यवसायांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जळगाव जिल्ह्यातील वीज उपलब्धता वाढल्यामुळे औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.औद्योगिक क्षेत्रासाठी मुबलक वीज उपलब्ध होणार असून कृषी उत्पादन प्रक्रिया आणि नवीन तंत्रज्ञानाला चालना मिळेल. स्थानिक व्यवसायांना मोठा वेग – नवे उद्योग, नव्या संधी निर्माण होणार आहेत.

ऊर्जासंपन्न जळगाव – ही ओळख भविष्यातील औद्योगिक, आर्थिक आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी निर्णायक ठरणार आहे.

जिल्हाधिकारी यांचे नागरिकांना आवाहन

वीज चोरी आणि अनधिकृत टॅपिंग रोखण्यासाठी सहकार्य करा. नवीन ऊर्जेच्या संधींचा लाभ घ्या – व्यवसाय व उद्योग वाढवा. शाश्वत, स्वच्छ आणि सक्षम ऊर्जा व्यवस्थेसाठी योगदान द्या असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी जिल्हा वार्षिक नियोजनच्या बैठकांमध्ये आणि दिशा समितीच्या आढावा बैठकीच्या माध्यमातून या सर्व प्रकल्पांचे नियमित परीक्षण करत आहेत.

 

जळगाव – ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने!

जळगाव जिल्हा आता केवळ कृषी आणि व्यापारासाठीच ओळखला जाणार नाही, तर ऊर्जा उत्पादन आणि व्यवस्थापनातील यशस्वी प्रयोगशील जिल्हा म्हणूनही पुढे येणार आहे. थर्मल आणि सौरऊर्जेच्या सहाय्याने, तसेच वितरण आणि प्रसारण सुधारणा यामुळे हा जिल्हा ऊर्जास्वयंपूर्णतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. जळगाव जिल्हावासियांनो प्रगतीत आपले योगदान द्या आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करा..!! जिल्ह्यातील विकासाचे नवे पर्व तुमच्या सर्वांचे सहकार्याने सुरु होणार आहे. चल संकल्प करू या, जळगावचा विकास करू या…!!

००००

– युवराज पाटील

जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव

- Advertisement -