कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूदीचा अर्थसंकल्प – कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे – महासंवाद

कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूदीचा अर्थसंकल्प – कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे – महासंवाद
- Advertisement -




मुंबई, दि. १० :  शेतकऱ्यांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास डोळ्यासमोर ठेवूनच उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी 2024-25 चा अर्थसंकल्प मांडला आहे. कृषी विभागाच्या योजनांसाठी एकूण 9 हजार 700 कोटींची भरीव तरतूद केली आहे असे मत कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले.

कृषिमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, या अर्थसंकल्पात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी सन 2025-26 मध्ये 351 कोटी 42 लाख रुपये तरतूद केली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत 2 लाख 13 हजार 625 लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षांसाठी 255 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शेतमालाच्या मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी 2100 कोटी रुपये किंमतीचा मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन-स्मार्ट प्रकल्प राबविण्यात येत आहे.

कृषिमंत्री कोकाटे म्हणाले की, महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्क-मॅग्नेट 2.0 हा 2100 कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण आखण्यात येत आहे.  ही प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी “कृत्रिम बुद्धीमत्ता” तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा होईल. येत्या दोन वर्षात त्यासाठी  500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्यांने शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, तसेच केंद्राच्या विविध योजनांच्या माध्यमातून कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठ  मिळवून देण्यासाठी पाठपुरावाही राज्य सरकार करत आहे. एकूणच शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमाने बळीराजाला बळ देण्याचे काम या अर्थसंकल्पात झाले असून, यांच्या योग्य अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकेल. कृषी केंद्रित हा अर्थसंकल्प असून याबाबत अर्थमंत्री पवार यांचे आभार मानतो.

०००

संध्या गरवारे/विसंअ

 

 







- Advertisement -