
नवी दिल्ली, दि. १० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा आणि हरियाणा राज्यातील पानिपत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली होती, आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात याबाबत तरतूद केली असल्याची घोषणा, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी केली. या दोन्ही ठिकाणी प्रेरणादायी इतिहासाची आठवण करून देणारे स्मारक उभारले जाईल.
मुघलांच्या नजरकैदेतून छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथुन सुटका करून निघालेत हा एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रसंग आहे. ज्या ठिकाणी ते नजरकैदेतेत होते, ती जागा महाराष्ट्र शासन अधिग्रहित करून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त यावर्षी 19 फेब्रुवारीला आयोजित कार्यक्रमात आग्रा येथे केली होती. तसेच यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते.
हरियाणा राज्यातील पानिपत येथे झालेल्या युद्धात मराठे शौर्याने लढले होते. ही लढाई 1761 मध्ये अफगाण शासक अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यात झाली होती. सदाशिवरावभाऊ आणि विश्वासराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अतिशय शौर्याने युद्ध केले. पानिपतच्या या युद्धात सदाशिवरावभाऊ जखमी होऊन त्यांना हौतात्म्य आले. स्थानिक आख्यायिकेनुसार, सदाशिवराव भाऊ आणि इतर मराठ्यांच्या रक्तामुळे या ठिकाणचे आंब्याचे झाड काळे झाले होते, त्यामुळे या जागेला काळा आंब असे नाव पडले आहे.
येथे शौर्य स्मारक अधिग्रहणासाठी राज्य शासन सहकार्य करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर्षी 14 जानेवारीला केली होती. यासाठी राज्यातील राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे समन्वयक साधतील असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले होते. आज उपमुख्यमंत्री पवार यांनी येथील स्मारक उभारण्यासाठी अर्थसंकल्पात तरतुदीची घोषणा केली. येत्या काळात भूमी अधिग्रहणाची कार्यवाही सुरू होईल.
०००