कन्नड-सोयगाव मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांना गती द्या – मंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद

कन्नड-सोयगाव मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांना गती द्या – मंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद
- Advertisement -




मुंबई, दि. ११ : कन्नड-सोयगाव मतदारसंघातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जल जीवन मिशनच्या प्रलंबित पाणीपुरवठा योजना दोन महिन्यांत पूर्ण कराव्यात, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. वन विभागाचे आवश्यक परवाने घेऊन जलवाहिन्यांच्या कामांना गती द्यावी, असेही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

मंत्रालयात आयोजित कन्नड-सोयगाव मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार संजना जाधव-दानवे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, अधीक्षक अभियंता अजय सिंह, छत्रपती संभाजीनगरचे अधीक्षक अभियंता दीपक कोळी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे आदी उपस्थित होते.

तांत्रिक अडथळ्यांवर तातडीने तोडगा काढा

मंत्री श्री. पाटील म्हणाले, जल जीवन मिशनअंतर्गत दिलेल्या १०० दिवसांच्या उद्दिष्टांची कामे तत्काळ मार्गी लावावीत. कन्नडमधील सिरसाळा आणि इतर चार गावांसाठी सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कार्यवाही तांत्रिक अडथळे दूर करून या महिन्यात पूर्ण करावी. रेल व कनकावतीनगर, देवगाव रंगारी, पिशोर आणि अन्य तीन गावांच्या पाणीपुरवठा योजनांबाबतही प्रलंबित कार्यवाही वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीत जिल्हा परिषदेंतर्गत सुरु असलेली कामे तातडीने मार्गी लावावीत. ४८ रखडलेल्या प्रकल्पांना अधिक कालावधी लावणाऱ्या ठेकेदारांना संरक्षण न देता कठोर कारवाई करावी. केवळ दंड न करता काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, अशा सूचना मंत्री श्री. पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

0000

धोंडिराम अर्जुन/स.सं/







- Advertisement -