
मुंबई, दि. 15 : मुंबईच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे येत्या २१ ते २४ एप्रिल २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव – २०२५ ’ आयोजित करण्यात आला असून या महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या ४१ चित्रपटांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी केली.
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या सयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन २१ एप्रिलला सायंकाळी सहा वाजता होणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री आठ वाजता रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे 99’ हा चित्रपट ओपनिंग फिल्म म्हणून दाखविण्यात येणार आहे तर २४ एप्रिल रोजी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट क्लोजिंग फिल्म म्हणून दाखविण्यात येणार असल्याचे मंत्री.ॲड शेलार यांनी सांगितले.
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रवींद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर आणि प्रायोगिक रंगमंच येथे हे सर्व चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. यामध्ये २२ एप्रिल रोजी अनुक्रमे सकाळी दहा वाजता ‘पळशीची पीटी’, ‘बटरफ्लाय’ आणि ‘येरे येरे पावसा’ हे चित्रपट दाखविण्यात येणार असून दुपारी एक वाजता ‘बाईपण भारी देवा’, ‘विषय हार्ड’ आणि तिच शहर होणं, दुपारी तीन वाजता मराठी भाषेवर आधारित ‘इंटरनॅशनल फालमफोक’, ‘ग्लोबल आडगाव’ आणि ‘या गोष्टीला नावचं नाही’, हे चित्रपट दाखविले जातील. सायंकाळी सहा वाजता ‘गोदाकाठ’,पाणी, आणि ‘झॉलिवूड’ तर रात्री आठ वाजता ‘भेरा’, विनोदी चित्रपट ‘चोरीचा मामला’ आणि ‘पॉडीचेरी हे चित्रपट दाखविण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड शेलार यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे, २३ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता ‘बार्डे’, ‘छबीला’ आणि शेतकरी आत्महत्येवरील ‘तेरव’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता ‘पोटरा’, ‘गिरकी’ आणि स्वातंत्र्य संग्रामावरील ‘शहिद भाई कोतवाल’ हे चित्रपट दाखविले जाणार आहे. दुपारी तीन वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेवर आधारित ‘जयंती’, ‘गाभ’ आणि ‘फनरल’ तर सायंकाळी 6 वाजता ‘स्थळ’, ‘अमलताश’ आणि ‘कुलुप’ हे चित्रपट दाखविले जाणार आहे. त्याचबरोबर रात्री आठ वाजता ‘मी वसंतराव’ हा बायोपिक, ‘बापल्योक’ आणि ‘ गोदावरी ’ हे चित्रपट दाखविले जातील.
२४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ‘स्वीट ॲण्ड शॉर्ट’, ‘रौंदळ’ आणि महेश मांजरेकर यांचा ‘जुन फर्नीचर’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता ‘मदार’, ऐतिहासिक असा ‘पावनखिंड’ आणि ‘कारखानिसांची वारी’ हे चित्रपट दाखविले जाणार आहे. दुपारी तीन वाजता राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘वाळवी’, ‘जग्गू आणि ज्युलिएट’, आणि राज्य पुरस्कार प्राप्त ‘वाय’ हे चित्रपट दाखविले जाणार असल्याची घोषणा मंत्री ॲड आशिष शेलार यांनी केली.
वरील सर्व चित्रपट सामाजिक, ग्रामीण, ऐतिहासिक, पर्यावरएण विषयक, स्त्री जीवनाविषयक प्रश्न मांडणारे, बालचित्रपट, विनोदी, ॲक्शन, व्यावसायिक यशस्वी झालेले चित्रपट असून चित्रपट रसिकांना हे सर्व चित्रपट विनामूल्य पाहता येतील. याकरिता ऑनलाईन नाव नोंदणी सुरू करण्यात आली असून कार्यक्रमस्थळी ऑफलाईन नावनोंदणी देखील सुरू आहे.
परिसंवाद , मुलाखत आणि बरच काही…
दिनांक २२ रोजी १२ ते दोन वाजेपर्यंत ख्यातनाम संगीतकार कौशल इनामदार यांची “ काल-आज-उद्याचे मराठी चित्रपट गीत-संगीत “ शब्द, सूर आणि तंत्र या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी तीन वाजता दिग्दर्शक हंसल मेहता यांची मुलाखत अभिनेते आणि कवी किशोर कदम घेतील. सायंकाळी सहा वाजता चित्रपटाचे तंत्र आणि सध्याच्या संधी या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यामध्ये उज्वल निरगुडकर, पंकज सोनावणे, सुप्रिया पाटणकर सहभागी होणार असून सौमित्र पोटे संवादक असतील.
दिनाक २३ एप्रिल रोजी दु.१२ वाजता सिने पत्रकार यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून जेष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, गणेश मतकरी हरी मृदुल मार्गदर्शन करतील. सूत्रसंचालन डॉ.संतोष पाठारे करतील. दुपारी तीन वाजता भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांचे स्थान या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यामध्ये जेष्ठ समीक्षक अशोक राणे, नितीन वैद्य, गजेंद्र अहिरे, मृणाल कुलकर्णी सहभागी होणार आहे. मनीषा कोरडे संवादक असतील. संध्याकाळी सहा वाजता मराठी चित्रपटांचे प्रसारण,प्रसिद्धी वितरण या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यामध्ये रोहन म्हापूस्कर, दिग्पाल लांजेकर, श्रीकांत भिडे, नानूभाई जयसिंगांनी, सादिक चितळीकर, गणेश गारगोटे, अमृता माने सहभाग घेतील. संवादक अमित भंडारी असतील.
दिनांक २४ एप्रिल रोजी दु. एक वाजता मराठी चित्रपटांचे व्यावसायिक गणित या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यामध्ये जेष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर, रवी जाधव, श्रीरंग गोडबोले, अभिजित पानसे सहभागी होणार असून विजू माने संवादक असतील. दुपारी ३ वाजता “कालचा आजचा आणि उद्याचा मराठी चित्रपट आणि ओटीटी (OTT) व्यवसायाचे गणित “ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादामध्ये आदिनाथ कोठारे, जयंत सोमळकर, सुहृद गोडबोले, वरुण नार्वेकर, अर्चना बोराडे, रोहन कानवडे, महेंद्र तेरेदेसाई सहभागी होणार आहेत.
सायंकाळी सहा वाजता समारोप सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
000
संजय ओरके/विसंअ