महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयोतून स्थानिकांना अधिकाधिक रोजगार द्या – रोहयोमंत्री भरत गोगावले – महासंवाद

 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयोतून स्थानिकांना अधिकाधिक रोजगार द्या – रोहयोमंत्री भरत गोगावले – महासंवाद
- Advertisement -

 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयोतून स्थानिकांना अधिकाधिक रोजगार द्या – रोहयोमंत्री भरत गोगावले – महासंवाद

नागपूर, दि. 16 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही सर्वसामान्यांच्या विकासासाठी आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी लागणारे सर्व सहकार्य शासनाच्या माध्यमातून केले जाईल. विकासकामांची आखणी सामूहिक हित लक्षात घेऊन केली पाहिजे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा असल्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.

महाराष्ट्र समन्वय 2025 कार्यशाळा वनामती येथील सभागृहात आज आयोजित करण्यात आली. यावेळी महासंचालक मनरेगा नंदकुमार, आयुक्त मनरेगा डॉ. भरत बास्तेवाड, वरिष्ठ व्यवस्थापक ॲक्सीस बँक फाऊंडेशन लतिका जॉर्ज, राज्य गुणवत्ता नियंत्रक राजेंद्र शहाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी बीआरएलएफ कुलदीप सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

रोजगार हमी योजनेअंतर्गत भारत ग्रामीण उपजीविका फाउंडेशन व मनरेगा यांच्या परस्पर सहकार्याने राज्यातील नांदेड, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर व यवतमाळ अश्या एकूण 5 जिल्ह्यामध्ये अति प्रभावित मेघा पाणलोट प्रकल्प सुरू असून प्रकल्पाला आर्थिक सहाय्य अक्सिस बँक फाउंडेशनकडून करण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत एकूण 26 तालुक्याचा समावेश आहे. या अनुषंगाने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून  विकासासाठी विविध प्रकल्प राबवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त प्रोत्साहनपर कामे करण्यासाठी तसेच बांबू लागवडीसाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्याचे श्री.गोगावले यावेळी म्हणाले.

मिशन मनरेगाचे महासंचालक नंदकुमार म्हणाले, रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवल्यास शेतक-यांसह सर्वांचे जीवन बदलेल. नागरिकांनी मनरेगाकडे लखपती व्हायचा मार्ग म्हणून पाहावे. रोजगार हमी योजनेतून 266 प्रकारची कामे आहेत. ती निकषांनुसार पूर्ण करा. विकासाची दृष्टी ठेवून, अभ्यास करून कामांचे नियोजन करावे. तुती लागवड, फळबाग लागवड अशा विविध मार्गांनी कामे करण्याचा विचार करा. यामध्ये युवकांचा सहभाग वाढवावा, असे ते म्हणाले.

रोजगार हमी कार्यालयाला भेट

रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज सिव्हिल लाईन्स येथील इमारत क्र.2 येथील रोजगार हमी योजनेच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध योजना व उपक्रमांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. यावेळी संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -