
मुंबई,दि. १६ :- कोल्हापूर महानगरपालिकेकडे थकित असलेल्या पाणीपट्टीच्या एकूण रक्कमेपैकी 10 कोटींची रक्कम दोन टप्प्यात तातडीने भरावी. ही रक्कम भरल्यानंतर उर्वरित थकित रक्कमेत सूट देण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल, असे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या थकीत पाणीपट्टीसंदर्भात मंत्रालयात जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस आमदार अमल महाडिक, आमदार शरददादा सोनावणे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अ. ह. धुमाळ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीस सहभागी झाल्या होत्या.
मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेकडे पाणीपट्टी पोटी सुमारे 62 कोटींची रक्कम थकित आहे. यापैकी आतापर्यंत 8 कोटी महापालिकेने भरले आहेत. उर्वरित रक्कमेतील 10 कोटींची रक्कम दोन हप्प्यात भरावी. त्यानंतर यासंदर्भात महापालिका व जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उर्वरित रक्कमेसंदर्भात मार्ग काढावा. उर्वरीत थकित पाणीपट्टींमध्ये सवलत देण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल.
महानगरपालिकेने यावर्षी 8 कोटी पाणी पट्टी भरली असल्याबाबतची माहिती महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी दिली. सन 2025 ते 2031 पर्यंत पाणी उपलब्ध होण्यासंदर्भात महानगरपालिकेने पाणी करार केला आहे. तसेच यावर्षीपासून प्रतिमहा पाणीपट्टी भरण्याचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
00000
एकनाथ पोवार/विसंअ