सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री जयकुमार रावल

सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री जयकुमार रावल
- Advertisement -

धुळे, दिनांक 19 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहण्याकरिता आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन नेहमीच कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

धुळे शहरात मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष, ए.बी. फाउंडेशन व प्रतीक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, माजी महापौर प्रदीप कर्पे, चंद्रकांत सोनार, प्रतिभाताई चौधरी, अंपळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.रावल म्हणाले की, नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी राज्य शासन विविध उपायोजना करीत आहेत. नागरिकांना आरोग्याच्या सुविधा आपल्या जिल्ह्यातच उपलब्ध होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहेत. याकरिता स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे घेण्यात येत असून या शिबिरांमध्ये आरोग्य पिडीत नागरिकांच्या विविध तपासण्या करण्यात येत आहेत. याठिकाणी आयोजित आरोग्य शिबिरात विविध आजारांच्या 1560 पेक्षा अधिक तपासण्या करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष त्याचबरोबर ए.बी. फाउंडेशन व प्रतीक फाउंडेशन यांनी भरविलेले आरोग्य शिबिर उपक्रम सुत्य आहे. या शिबिराचा सर्वसामान्य नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. या शिबिरात जे आरोग्य पीडित रुग्ण असतील त्यांचेवर पुढील उपचार सिव्हील हॉस्पिटल त्याचबरोबर हिरे वैद्यकीय मेडिकल महाविद्यालयात करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी जे उपचार उपलब्ध होत नसतील अशा रुग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक अथवा मुंबई येथे संदर्भित  करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री बोलताना पुढे म्हणाले की, धुळे जिल्ह्याला आरोग्य विषयक सर्व सोईसुविधांनी परिपूर्ण करण्याचं आम्ही ठरवलं आहेत. याकरीता सिटीस्कॅन सोबतच अजून काही मशिन लवकरच हिरे महाविद्यालयाला उपलब्ध होणार आहे. महिलांसाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी रुग्णालय, तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज रुग्णालय निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. धुळे जिल्ह्य़ात सर्वाना सोबत घेऊन आरोग्य, सिंचन, उद्योग, औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करणार आहे. यावेळी त्यांनी  ए. बी. फाउंडेशन आणि प्रतिक फाऊंडेशनच्या कामाचेही कौतुक केले.

यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी आरोग्य शिबीर आयोजनामागील भूमिका विषद केली. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आरोग्य शिबिरात रक्तदान ‍‍शिबीर  तसेच लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात आले या शिबिरास 2 हजारापेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते.

- Advertisement -