Home बातम्या भारतीय सैन्याला नामोहरम करेल, असा शत्रू निर्माण व्हायचाय; लेफ्टनंट जनरल पी.जे.एस.पन्नु

भारतीय सैन्याला नामोहरम करेल, असा शत्रू निर्माण व्हायचाय; लेफ्टनंट जनरल पी.जे.एस.पन्नु

0

भारतीय सैन्याला नामोहरम करेल, असा शत्रू निर्माण व्हायचाय; लेफ्टनंट जनरल पी.जे.एस.पन्नु

भारतीय सैन्याला नामोहरम करेल, असा शत्रू निर्माण व्हायचा आहे. लढाईसाठी शत्रू आव्हान देण्याची आम्ही प्रतीक्षा करत असतो. कारण आपली परंपरा ही शांततेवर विश्वास ठेवणारी आहे. पण कोणत्याही युद्धासाठी आम्ही सज्ज आहोत. अशी ग्वाही  लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नु यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मराठा लाईट इन्फंट्रीने उभारलेल्या म्युझियमचे (संग्रहालय) उद्घाटन लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नु यांच्या हस्ते व तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांच्या उपस्थितीत गुरुवारी करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली.

ते म्हणाले शत्रू स्वतः आव्हान देईल यासाठी प्रतीक्षा करणे केव्हाही चांगले असते. आम्ही मराठा सैनिक गरम रक्ताचे आहोत. कोणी चाल केली किंवा आक्रमण केले तर सडेतोड उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. तथापि आम्ही स्वतः कुरापत काढत नाही. कारण भारतीय परंपरा ही शांततेवर विश्वास ठेवणारी आहे. या परंपरेचे जतन आम्ही करतो. शांतता तेव्हाच निर्माण होते जेव्हा आम्ही सर्व तयारीनिशी युद्धासाठी सज्ज असतो. ‘छोटा दुष्मन बडी धमकी देता है उसे कोई फरक नही पडता’. लढाई लुटुपुटूची असो किंवा मोठी असो आमचे सैनिक शत्रुवर तुटून पडणार हे नक्की, असेही ते म्हणाले.

छत्रपती शिवराय हे प्रेरणास्थान

लढण्याची प्रेरणा आम्हाला इन्फंट्रीतून मिळते. याचे कारण आमचा आदर्श, आमचे प्रेरणास्थान हे छत्रपती शिवराय आहेत. ज्यांनी भारतामध्ये स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. इंग्रज असो किंवा मोगल छत्रपतींनी सर्वांचेच आक्रमण परतवले. त्यामुळे आमच्या सर्व पलटणींना शिवराय प्रेरणा देतात. रणभूमीतही ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या एका घोषणेने सैनिक शत्रुवर तुटून पडतात. मर्द मराठे खरे, असे आमच्या बाबतीत म्हटले जाते. कारण सहनशीलता, सभ्यता ही आमची ताकद आहे, असे त्यांनी नमूद केले.

*संग्रहालयामुळे जवानांना प्रेरणा*

सदर संग्रहालयाबद्दल बोलताना हे संग्रहालय इन्फंट्रीची सभ्यता, साहस आणि सन्मान याचे साक्षीदार ठरेल. आमचे सैनिकांना हे संग्रहालय प्रेरणा तर देत राहिलच. परंतु पुढील पिढय़ांनासुद्धा आम्ही कोणत्या कणखर मातीचे आहोत, हे सुद्धा दाखवून देईल. जन्मभूमी आणि कर्मभूमी येथून रणभूमीवर जाणाऱया जवानांना हे संग्रहालय प्रेरणा देईल, असेही त्यांनी सांगितले.