भविष्यात संपर्क ठेवण्यास नकार दिल्याने मित्राने मैत्रिणीवर केले धारदार शस्त्राने वार
पुणे शहरात मित्रानेच मैत्रिणीवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना नऱ्हे येथे रविवारी (दि.22) दुपारी घडली. मित्राला भेटण्यासाठी ती त्याच्याकडे आलेली असताना दोघांमध्ये झालेल्या वादावादीमधून ही घटना घडली. जखमी तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणीने मित्राबरोबर संपर्क तोडल्यामुळे तिच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही जण सोलापुरातील आहेत. आरोपी तरुण हा नऱ्हे परिसरातील इमारतीमध्ये मित्रासोबत राहतो. तो एका खासगी कंपनीत काम करतो. जखमी तरुणी इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला सोलापूर येथे शिकते. प्रॅक्टिकल असल्यामुळे ती रविवारी आईसोबत पुण्यात आली होती. रविवारी सकाळी प्रॅक्टिकलला जात असल्याचे सांगून तरुणी घराबाहेर पडली आणि आरोपीला भेटण्यासाठी नऱ्ह्यातील त्याच्या खोलीवर गेली.
त्यावेळी तिने संबंधित तरुणाबरोबर भविष्यात संपर्क ठेवण्यास नकार दिला. त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर तरुणी इमारतीच्या गच्चीवर गेली. तिच्या मागे जाऊन आरोपीने धारदार चाकूने तिच्यावर वार केले. हल्ला केल्यानंतर तरुण फरारी झाला. या हल्ल्यामध्ये तरुणीच्या हातावर, छातीवर आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या प्रकृतीवरील धोका टळला असून, तिचा जबाब नोंदविण्याचे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सिंहगड पोलीस तपास करीत आहेत