Home ताज्या बातम्या परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलेला अज्ञाताने चार लाख रुपयांचा घातला गंडा

परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलेला अज्ञाताने चार लाख रुपयांचा घातला गंडा

0

परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलेला अज्ञाताने चार लाख रुपयांचा घातला गंडा

परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलेला अज्ञाताने चार लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.
याबाबत एका ३४ वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार महिला घटस्फोटित आहे. सहा महिन्यांपूर्वी अज्ञाताने महिलेला समाजमाध्यमावर मैत्रीची विनंती पाठविली होती. महिलेने त्याची विनंती स्वीकारली. त्यानंतर त्यांच्यात संवाद सुरू झाला.

अज्ञाताने महिलेला विवाहाचे आमिष दाखविले. लंडनमधील एका व्यापारी नौकानयन कंपनीत कामाला असल्याची बतावणी त्याने केली.

त्यानंतर महिलेला परदेशातून हिरेजडित दागिने, मोबाइल संच तसेच वस्त्रप्रावरणे पाठविण्याचे आमिष दाखविले. महिलेने त्याच्या बतावणीवर विश्वास ठेवला.

त्यानंतर अज्ञाताने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. भेटवस्तूंचे खोके दिल्ली आंतराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतले आहे. भेटवस्तूंचे खोके ताब्यात घेण्यासाठी सीमा शुल्क जमा करावे लागेल, असे तिला सांगण्यात आले. त्यानंतर महिलेने बँक खात्यात ४ लाख ९ हजार जमा केले.

दरम्यान, महिलेने अज्ञाताच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला, तेव्हा मोबाइल क्रमांक आणि समाजमाध्यमावरील खाते बंद असल्याचे निदर्शनास आले. महिलेने काही दिवसांपूर्वी खडक पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. तक्रार अर्जावरून पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे तपास करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली. समाजमाध्यमावर अनोळखी व्यक्ती बरोबर मैत्री करू नका, आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन सायबर गुन्हे शाखेकडून वेळोवेळी करण्यात आले. मात्र, पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे काणाडोळा करण्यात येत असल्याने अशा प्रकारे फसवणूक होण्याचे सत्र कायम आहे.