Home अश्रेणीबद्ध नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे डिझेल टँकर उडवला; तीन जण ठार

नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे डिझेल टँकर उडवला; तीन जण ठार

0

कांकेर : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या कांकेर जिल्ह्यातील ताडोकी परिसरात आज मंगळवारी नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे एक डिझेल टँकर उडवला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात मृत्यू झालेल्या तीन जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. परिसरात सुरू असलेल्या रेल्वे लाइनच्या कामाच्या ठिकाणी हे डिझेल टँकर नेले जात होते. स्फोटानंतर स्थानिक पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याचीही माहिती आहे.

भूसुंरग पेरल्यानंतर नक्षलवादी परिसरातच दबा धरून बसलेले होते. याचदरम्यान डिझेलच्या टँकराचा स्फोट घडला . पोलीस अधीक्षक केएल ध्रुव यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणल्याची माहिती मिळताच, पोलीसाची तुकडी घटनास्थळी दाखल झाली व नक्षलवादी आणि पोलीसांमध्ये चकमक सुरू आहे.

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या बस्तर परिसरात सध्या नक्षलविरोधी अभियान जोरदार सुरू आहे. १५ सप्टेंबर रोजी सुकमा जिल्ह्यात जवानांनी चकमकीत तीन नक्षलींचा खात्मा केला होता. त्याच्या एक दिवस अगोदरच बस्तर परिसरात तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते.