
- मुख्यमंत्र्यांनी स्विकारली तब्बल १ हजार ५१ नागरिकांकडून निवेदने
- हैद्राबाद हाऊस येथे आयोजित जनता दरबारात प्रातिनिधीक स्वरूपात पट्टे वाटप
नागपूर, दि. १७ : नागपूर महानगरामध्ये अनेक वर्षांपासून स्वत:च्या मालकी हक्काचे घर व्हावे अशी इच्छा हजारो झोपडपट्टीधारकांची आहे. या पासून वंचित असलेल्या लोकांना पट्टे वाटपाच्या माध्यमातून हक्काचे घर मिळत आहेत. निकषाची पुर्तता करणारा एकही व्यक्ती हक्काच्या घरांपासून वंचित राहणार नाही. जे झोपडपट्टीधारक शासनाच्या निकषात मोडतात त्यांनी आपल्या हक्काच्या घरासाठी महानगरपालिका, नझूल विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हैदराबाद हाऊस येथे आयोजित जनता दरबाराचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ७ वेगवेगळ्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या २१ झोपडपट्टी धारकांना प्राथमिक स्वरुपात पट्टे वाटप करून झाला. यानंतर त्यांनी जनतेची निवेदने स्विकारली. यावेळी विधान परिषद सदस्य संदिप जोशी, आमदार प्रवीण दटके, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, प्रभारी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, महामेट्रोचे महाव्यवस्थापक अनिल कोकाटे, आदी यावेळी उपस्थित होते.
सर्वासाठी घरे योजना-2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने नागपुर शहरामधील नझुलच्या जागेवरील 33 झोपडपट्टीच्या प्रस्तावातील 3 हजार 714 झोपडपट्टी धारकांचे अतिक्रमण नियमानुकुल करण्यात आले आहे. आजवर मंजुर पट्टेपैकी 2157 पी.टी.एस झोपडपट्टी धारकांना चलान देण्यात आलेले आहेत. पंरतु सदर अकृषीक आकारणीची रक्कम चलानाद्वारे भरणा केलेली नसल्याने वाटप करण्यास शिल्लक आहे. याबाबत शिबीर घेवून कार्यवाही केली जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय (महसुल विभाग) नागपूर कडुन 18 झोपडपट्टी पैकी तुकडोजी नगर, कामगार कॉलनी, भांडेवाडी या 3 झोपडपट्टयामध्ये एकुण 160 झोपडपट्टी धारकांना पट्टे वाटप करण्यात आले आहेत. 474 संबधित पट्टेधारकांनी चलानाची रक्कम शासन जमा केल्यानंतर पट्टा वाटप करण्यात येईल. याबाबत दिनांक 20.5.2025 रोजी शिबीर आयोजीत करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
उर्वरित चिंचभुवन, शामनगर, गिट्टीखदान, पन्नालाल देशराज नगर, आदिवासी नगर, पुनापुर, वाठोडा, भरतवाडा, हुडकेश्वर, कुराडपुरा, शोभाखेत, बिनाकी, कोष्टीपुरा, ठक्करग्राम व नारागाव या 15 झोपडपट्टीमध्ये 1121 पट्टे वाटप करणे शिल्लक आहे. त्यापैकी 2 झोपडपट्टी मध्ये पट्टे वाटपासाठी दिनांक 19 मे 2025 रोजी जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजीत करण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्र्यांनी स्विकारली तब्बल १ हजार ५१ नागरिकांकडून निवेदने
सर्वसामान्य नागरिकांना जनता दरबारातून आपले प्रश्न मार्गी लागतात असा लोकांचा विश्वास वाढीस लागला आहे. यासाठी जाणिवपूर्वक महिन्यातून एकदा जनता भेटीचा कार्यक्रम नागपूर मध्ये मुख्यमंत्री या नात्याने मी करतो. यात प्राप्त झालेल्या लोकांच्या निवेदनांवर गंभीरतेने विचार करून पात्र असलेल्या प्रत्येकाला न्याय मिळतो ही समाधानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हैदराबाद हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यात महिलांपासून वयोवृध्द नागरिकांपर्यंत, तरूणांपासून दिव्यांग व्यक्तिंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांना आपली निवेदने दिली. निवेदन देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यादृष्टीने भव्य मंडप व कुलर्सची व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांनी स्वयंशिस्तीचा प्रत्यय देत अप्रत्यक्षरित्या प्रशासन व शासकीय प्रणालीबाबतचा विश्वास दृढ केला. राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीच्या शिष्ट मंडळानी भेट घेवून आपल्या मागण्याचे निवेदन दिले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
माजी खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट घेतली. यात संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ तातडीने सुरू करणे व त्यावर समाजाचे प्रतिनिधी नेमणे, पारंपारिक तेल घाणी उद्योगाच्या पुर्नविकासासाठी मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान राज्याच्या धर्तीवर महामंडळ स्थापन करणे, तेलघाणीतील सुटे तेल विक्रीवर शासनाचे निर्बंध उठविणे आदी मागण्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या.
या शिष्टमंडळात माजी खासदार रामदास तडस, डॉ. भुषण कर्डिले, गजानन शेलार, संजय विभुते, बळवंतराव मोरघडे, पुष्पाताई बोरसे, अतुल वांदिले, जगदिश वैद्य, कुणाल पडोळे, प्रविण बावनकुळे, नरेंद्र सुर्यवंशी, भगवान बोरसे हे पदाधिकारी सहभागी होते.
00000