
मुंबई, दि. १९ : चौथ्या मुंबईतील वाढवण बंदर हे जेएनपीटी पेक्षा तीन पटीने मोठे असून आता वाढवण बंदर हे जगात पहिल्या प्रमुख दहा बंदरात गणले जाणार आहे. त्यामुळे हे बंदर पुढील २० वर्षात नवीन अर्थव्यवस्था निर्माण करेल. एकट्या मुंबईत सध्या १.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१३-१४ या तुकडीच्या भारतीय विदेश सेवेतील १४ अधिकाऱ्यांशी सह्याद्री अतिथीगृह येथे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव सीमा व्यास आदी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईच्या विकासासाठी बंदराचा विकास करणे आवश्यक आहे. यासाठी कोस्टल मार्ग तयार करण्यात येत आहे. अटल सेतूमुळे तिसरी मुंबई तयार होत आहे. त्याचबरोबर आता मुंबईत ‘एज्यूसिटी’ तयार करण्यात येत आहे. या एज्यूसिटीत देशातील १२ विद्यापीठ असतील. ही ‘एज्यूसिटी’ २०० एकर जागेवर उभी करण्यात येणार असून यामध्ये अंदाजे १ लाख विद्यार्थी शिक्षण घेतील. तसेच ३०० एकर जागेवर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबईला तंत्रज्ञानामध्ये सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी १००० एकर जागेवर नॉलेज सिटी उभारण्यात येत आहे. त्यामुळे पुढील ५ वर्षात संपूर्ण बदललेली मुंबई दिसेल.
विदेश सचिव आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या या संवादात विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राच्या जागतिक स्तरावरील गुंतवणूक संधी, परराष्ट्र धोरणाशी संबंधित राज्याचा सहभाग, विकसित भारत तसेच महाराष्ट्रातील विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्पांविषयी विचारविनिमय झाला.
0000
संजय ओरके/विसंअ/