
मुंबई, दि. 21 : आरोग्य क्षेत्रात राज्य व देश पातळीवर अभिनव व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांना उत्कृष्ठ आरोग्यसेवा देणाऱ्या सेवाभावी संस्थानी आज आरोग्य भवन येथील कार्यालयात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमोर सादरीकरण केले.
या सादरीकरणात पब्लिक हेल्थ फाउंडेशन इंडिया, महाबळेश्वर येथील रेड क्रॉस सोसायटी संचलित बेल एअर फाउंडेशन, धाराशिव येथील प्राईड इंडिया संचलित स्पर्श रूरल हॉस्पिटल, नांदेड येथीक नंदिग्राम लायन्स ट्रस्ट संचलित आय हॉस्पिटल, इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन महाराष्ट्र, IAPSM तसेच इंदापूर तालुक्यातील भिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर शुश्रुत शाह यांनी आरोग्य क्षेत्रातील अभिनव उपक्रमांचे सादरीकरण केले.
आरोग्य सेवा सामान्य लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचवण्यासाठी, या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थाचे सहकार्य घेण्याच्या अनुषंगाने आज विविध संस्थानी आपल्या कामाचे सादरीकरण केले. आयआयटी व आयआयएम या संस्थांच्या धर्तीवर महाराष्ट्रात आरोग्य विभागाचे वतीने “इंडियन इन्स्टिट्युट ऑफ पब्लिक हेल्थ (IIPH)” स्थापन करण्याबाबत पब्लिक हेल्थ फाउंडेशनच्या वतीने डॉ.झोडगे यांनी सादरीकरण केले. आरोग्य विभागातील सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांना व्यावसायिक पद्धतीचे संवाद कौशल्य प्रशिक्षण, त्यांची क्षमता बांधणी, तांत्रिक सहकार्य या बाबत सादरीकरण केले.
सन १९९३ साली लातूर जिल्ह्यातील किल्लारी व सास्तुर येथे झालेल्या भूकंपानंतर प्राइड इंडिया या संस्थेने सास्तुर येथे आरोग्य क्षेत्रात स्पर्श रुरल हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरु केलेल्या कामाचे आज सादरीकरण झाले. त्यांच्या शाश्वत ग्राम आणि मोबाईल मेडिकल युनिट, एम मित्रा, सुंदर माझा दवाखाना, किचन गार्डन हे उपक्रम अनुकरणीय आहेत.
नांदेड येथील नंदिग्राम लायन्स ट्रस्टच्या साईट फर्स्ट उपक्रमाचे तसेच इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने तंबाखू नियंत्रण आणि आई पी एस एम इंटरशिप प्रोग्रॅमचे सादरीकरण करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील आरोग्य सेवेत कार्यरत असलेले डॉक्टर सुश्रुत शहा यांनी डास निर्मूलनासाठी केलेल्या प्रयोगाचे तसेच स्मार्ट मॉडेल पी एस सी अंतर्गत राबवलेल्या योजनांचे सादरीकरण केले. महाराष्ट्रातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या या उपक्रमाचे आरोग्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. राज्यातील इतर आरोग्य संस्थांनी ही अशा उपक्रमांचे अनुकरण करणे आवश्यक असल्याचे मत आरोग्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले.
000