भारत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थशक्ती – महासंवाद

भारत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थशक्ती – महासंवाद
- Advertisement -

भारत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थशक्ती – महासंवाद

मुंबई, दि. 25: “भारताची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्सच्या टप्प्यावर पोहोचली असून, आपला देश आज जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थशक्ती ठरला आहे, ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची आणि आनंदाची आहे. हे यश प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या सक्षम नेतृत्वाचे आणि सातत्याने घेतलेल्या ठोस निर्णयांचे फलित आहे. त्यांनी दिलेल्या ‘विकसित भारत-2047’चे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो,” अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, नीती आयोगाच्या बैठकीनंतर भारताच्या आर्थिक स्थितीबाबत नीती आयोगाचे सीईओ बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने जपानला मागे टाकून चौथा क्रमांक पटकावला आहे. आता आपल्यापुढे केवळ अमेरिका, चीन आणि जर्मनी आहेत. ही केवळ आकड्यांची झेप नाही, तर सक्षम धोरणांची, प्रभावी नेतृत्वाची आणि ठोस अंमलबजावणीची प्रचिती आहे.

भारताला लाभलेली तरुण लोकसंख्या, नीती आयोगासारख्या संस्थांचे मार्गदर्शन आणि राज्य-केंद्र सरकारमधील प्रभावी समन्वयामुळे येत्या अडीच ते तीन वर्षांत भारत तिसऱ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होईल. प्रधानमंत्रीयांनी सर्व राज्यांना आपापल्या पातळीवर विकासाचे दीर्घकालीन व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला महाराष्ट्राने सकारात्मक प्रतिसाद दिला असून महाराष्ट्र नक्कीच देशाच्या विकासात आघाडीवर असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय धोरणानुसार, महाराष्ट्र सरकारने सुद्धा ‘महाराष्ट्र 2047’ असे व्हीजन तीन टप्प्यात तयार केले आहे. 100 दिवसांच्या सुशासन, नागरिक केंद्रीत उपाययोजना आणि उत्तरदायित्त्व अशा सूत्रावर एक कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने हाती घेतला आहे. यात विविध विभागांनी 700 हून अधिक उद्दिष्ट साध्य केले. आता दीडशे दिवसांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात 2047 साठी दीर्घकालीन, महाराष्ट्र आपला अमृत महोत्सव साजरा करेल, त्या कालावधीचे म्हणजे 2035साठी आणि प्रतिवर्षाच्या उद्दिष्टांसह 2029 साठीचे अल्पकालिक 5 वर्षांचे असे व्हीजन तयार करण्यात येत आहे. विद्यमान अर्थव्यवस्था 2030 पर्यंत एक ट्रिलियन डॉलर्स करण्याचे मुख्य उद्देश आहे.

भारताच्या आर्थिक प्रगतीचे श्रेय देशातील सामान्य जनतेच्या कष्टांना, उद्योग जगताच्या योगदानाला आणि केंद्र सरकारच्या निर्णयक्षम, परिणामकारक नेतृत्वाला जाते. हे यश आपल्याला अधिक व्यापक, समावेशक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देणारे आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करून त्यांचे आभार मानले.

000

- Advertisement -