Home गुन्हा गुन्हेगारी चित्रपटावरून त्याने केला मित्राचा खून

गुन्हेगारी चित्रपटावरून त्याने केला मित्राचा खून

0

पुणे : गुन्हेगारी चित्रपटवरून त्याने कट रचला. कोणताही पुरावा मागे राहू नये, याची दक्षता घेताना त्याने पोलीस कसा तपास करतात, याचाही अभ्यास केला. गोव्यापर्यंत पळून जाताना त्याने मोबाईलचा वापर केला नाही. गरज वाटलीच तर सहप्रवाशांच्या मोबाईलवरून तो फोन करीत असे. एका ठिकाणी तो १५ मिनिटांपेक्षा अधिक काळ थांबत नसे. त्यामुळे तो अमुक ठिकाणी आहे, असे कळल्यावर पोलीस तेथे पोहचेपर्यंत तो तेथून निघून गेलेला असे. वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेताना शेवटी हडपसर पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले. मात्र, अजून खून झालेल्या तरुणाचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला नाही.

अनैतिक संबंधातून एका तरुणाचा त्याच्या मित्राने डोक्यात काठीने घाव घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर पोलिसांनी खून करणाऱ्यास अटक केली आहे. बालाजी पखाले (वय ३०, रा़ वडकी गाव, हवेली) असे त्याचे नाव आहे. तर खून झालेल्या तरुणाचे नाव विशाल ओव्हाळ असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हा २९ सप्टेंबर रोजी सकाळी कामावर जातो, असे सांगून घराबाहेर पडला तो परत आला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी बेपत्ता झाल्याची तक्रार हडपसर पोलिसांना दिली. पखाले बांधकाम साईटवर गुत्तेदारी करण्याचे काम करत होता. विशालच्या वडिलांचाही तोच व्यवसाय असल्याने दोघांची ओळख होती. त्यातून घरी जाणे सुरु झाले़ विशालची व आरोपीच्या पत्नीची ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याची माहिती पखाले याला लागल्यावर त्याने विशालला धमकी दिली होती.

विशाल व बालाजी यांना त्याच्या एका मित्राने रोहित वाईनसमोर भांडताना पाहिले होते. बालाजीने विशालला पत्नीचा नाद सोड, नाही तर काटा काढेन अशी धमकी दिली होती. पखाले व त्याच्या पत्नीमध्ये यावरून अगोदर भांडणे झाली होती. २९ सप्टेंबरला पखाले विशालला दारू पिण्यास घेऊन गेला. त्यानंतर तो विशालला फुरसुंगी परिसरातील कॅनॉलजवळ घेऊन गेला. तेथे त्याने एका दांडक्याने विशालवर घाव घातला. एका फटक्यात विशाल खाली पडल्यावर त्यावर एकापाठोपाठ घाव घालत त्याने ठार मारले व त्याचा मृतदेह उचलून कॅनॉलच्या पाण्यात फेकून दिला. त्याची गाडीदेखील पाण्यात टाकली़ त्यानंतर तो पत्नीला घेण्यासाठी सासुरवाडीला गेला होता. याची माहिती विशालच्या नातेवाइकांना मिळाल्यावर तो तेथूनही फरार झाला.