Home शहरे पुणे चिडचिड, अन्‌ मनस्ताप; तासाभराच्या पावसानंतर शहरात वाहतूक कोंडी

चिडचिड, अन्‌ मनस्ताप; तासाभराच्या पावसानंतर शहरात वाहतूक कोंडी

0

पुणे : सायंकाळी साडेसहाची वेळ.. धुवाधार पाऊस.. बंद सिग्नल.. नियमांचे पालन न करता वेडीवाकडी जाणारी वाहने.. बंद पडलेल्या बसेस.. अंतर्गत रस्त्यांवर येणारा हॉर्नचा कर्कश्‍श आवाज.. काही ठिकाणी वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती.. आणि वाहनचालकांची चिडचिड, असे वातावरण शहरात अवघ्या पाऊण ते एक तासाभरात झाले.

सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने वाहतूक कोंडीने पुन्हा एकदा डोके वर काढले. पुणेकरांसाठी जणू दररोजची बाब असणाऱ्या संथ वाहतुकीचे रूपांतर सायंकाळी वाहतूक कोंडीमध्ये झाले. शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांतून घरी जाण्याच्या वाटेवर असणाऱ्या नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागली. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये रस्ते आणि उड्डाणपुलांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या.

अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणा ठप्प झाली होती. तर बहुतांश ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहन चालवणे अवघड झाले होते. पर्यायाने चालकांची चांगलीच तारांबळ झाली. तर पावसामुळे पीएमपीच्या बसेस विविध ठिकाणी बंद पडल्या होत्या. यामुळे बस बंद पडलेल्या ठिकाणापासून मागे वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

स्वारगेट, अभिनव चौक, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता, गोखले रस्ता (फर्गसन महाविद्यालय रस्ता), जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, नारायण पेठ, सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ, नागनाथपार, शनिपार, सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, डेक्‍कन, पुणे विद्यापीठ रस्ता, सातारा रस्ता, वारजे या रहदारीच्या मुख्य ठिकाणांसह उपनगरांतून शहरांत येणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती.