Home बातम्या नि:पक्ष व भयमुक्त वातावरणात मतदान प्रक्रिया पूर्ण होतील – निवडणूक निरीक्षक राजेंद्र किशन

नि:पक्ष व भयमुक्त वातावरणात मतदान प्रक्रिया पूर्ण होतील – निवडणूक निरीक्षक राजेंद्र किशन

0

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील तीन मतदारसंघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नसून आपली या विधानसभा क्षेत्रात नियुक्ती झाल्याचे समाधान निवडणूक निरीक्षकांनी व्यक्त केले. या जिल्ह्यात कुठेही कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यांची सर्वांनी दक्षता घेऊन नि:पक्ष, हिंसाचारविरहित व भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पडतील, असे प्रतिपादन सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक राजेंद्र किशन (आय.ए.एस.) यांनी आज व्यक्त केले.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करिता मा.भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक राजेंद्र किशन, निवडणूक खर्च निरीक्षक श्री.रविंदर कुमार (आय.आर.एस.) आणि निवडणूक पोलीस निरीक्षक श्रीमती एम.साथीया प्रिया (आय.पी.एस.) अशा तीन निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. हे तीनही निरीक्षक आणि मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या उपस्थितीत आज उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीसह बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

श्री.किशन म्हणाले की, मतदान प्रकियेकरिता वापरण्यात येत असलेल्या इ.व्ही.एम. मशीन्स अतिशय उत्तम आणि विश्वासार्ह असून याबाबत कोणत्याही उमेदवाराने किंवा मतदारांनी शंका घेऊ नये. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व इ.व्ही.एम.मशीन्स स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात येणार असून यावर 24 तास सी.सी.टी.व्ही.द्वारे लक्ष ठेवण्यात येईल. तसेच प्रत्येक उमेदवारांनी आपली जबाबदारी म्हणून प्रसिद्धी आणि प्रचारावर होत असलेल्या खर्चाची पूर्वकल्पना निवडणूक खर्च समितीकडे द्यावी.

निवडणूक खर्च निरीक्षक श्री.रविंद्रर कुमार म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. याचे पालन सर्व उमेदवारांनी करावे. कोणत्याही प्रकारच्या काही अडचणी, तक्रारी असल्यास त्यांनी त्या सी-व्हिजील या ॲपवर नोंदवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

निवडणूक पोलीस निरीक्षक श्रीमती एम.साथीया प्रिया म्हणाल्या की, सर्व उमेदवारांनी निवडणूक निर्देशांचे पालन करावे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत असून उमेदवार आणि मतदार यांना कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सर्वप्रथम उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.जयकृष्ण फड यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने झालेली कार्यवाही विषद केली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा कोषागार अधिकारी डॉ.शिवप्रसाद खोत, कणकवली मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वैशाली राजमाने, कुडाळ मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वंदना खरमाळे आणि सावंतवाडी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.सुशांत खांडेकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.