Home ताज्या बातम्या ओम भरत मुरकुटेची युरोपातील स्केटिंग स्पर्धेत कामगिरी

ओम भरत मुरकुटेची युरोपातील स्केटिंग स्पर्धेत कामगिरी

0

ओम भरत मुरकुटेची युरोपातील स्केटिंग स्पर्धेत कामगिरी

पुणे : परवेज शेख , ता, १४: युरोपमधील बेलारुस येथे इंटरनॅशनल स्केटिंग युनियनतर्फे (ISU) आईस स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भारताकडून पंधरा वर्ष वयोगटाखालील ओम मुरकुटे याने पाचशे, हजार आणि पंधराशे मीटर स्केटिंगचे टप्पे पार करत भारतीय गटासाठी बेलारूस कप मिळवून देशाचे नाव उंचावले आहे.

या स्पर्धेत भारतासह अमेरिका, रशिया आणि बेलारुस या देशांनी सहभाग घेतला होता. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पार पडलेल्या बेलारूस कपच्या आधी स्पर्धेच्या ठिकाणी पंधरा दिवसांचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता.
या कॅम्पच्या माध्यमातून स्पर्धकांची कुवत पारखून बेलारूस कपसाठी त्यांची निवड केली जाते. प्रामुख्याने ही स्पर्धा चार गटांसाठी आयोजित केली जाते. त्यात तेरा वर्ष वयोगटाखालील स्पर्धक, पंधरा वर्ष वयोगटाखालील स्पर्धक, एकोणीस वर्ष वयोगटाखालील स्पर्धक आणि एकोणीस वर्षांच्या पुढील स्पर्धकांचा समावेश असतो. ओम हा आधीपासूनच कनिष्ठ भारतीय संघात असल्यामुळे स्केटिंग या खेळात तो पारंगत आहे. या स्पर्धेत पंधरा वर्ष वयोगटाखालील स्पर्धकांच्या तीन मुलांच्या गटाचे प्रतिनिधित्व ओम मुरकुटे याने केले होते.

बेलारूस कपसाठी निवड होण्याआधी राष्ट्रीय पातळीवर निवड केली जाते. त्यांनतर आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात येते. यामध्ये ओम मुरकुटे याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत कांस्य पदक पटकावून आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या बेलारूस कपसाठी जागा पटकावली.

स्केटिंग स्पर्धेसाठी ओम भरत मुरकुटे याला भारताचे पहिले आईस स्केटिंग खेळाडू आणि राष्ट्रीय प्रशिक्षक अवधूत तावडे यांनी मार्गदर्शन आणि सरावात मदत करून तयार केले. या स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर ओम याने स्पर्धेपूर्वी मुंबई येथील एसेल वर्ल्ड येथे आईस स्केटिंग रिंकवर सराव करून दुसरा सराव हा दिल्ली येथील आईस स्केटिंग रिंकवर केला. बाणेर येथे राहणारा ओम भरत मुरकुटे हा नववीला डि.ए.व्ही पब्लिक स्कुलमध्ये शिकत असून स्केटिंग त्याचा छंद आहेच पण या खेळासाठी वडिलांचा पाठिंबा असल्याने अधिकच प्रयत्न करण्याची शक्ती मिळते, असे यावेळी ओमने सांगितले.

याशिवाय, स्केटिंग स्पर्धेला उच्च स्थान मिळण्यासाठी (ISAI) आईस स्केटिंग असोसिएशन ऑफ इंडियातर्फे विदेशात वर्षातून चार ते पाच वेळा दहा ते वीस दिवसाचे कॅम्प आयोजित केले जातात. या माध्यमातून स्केटिंग या खेळाकडे बालवयातच मुलांचा ओढा वाढावा, हा या मागील उद्देश असल्याचे स्केटिंग खेळातील तज्ज्ञांचे मत आहे.