वनविभागाच्या जागेत झाडांची कत्तल करुन अतिक्रमण करणाऱ्या कंपनी विरोधात गुन्हा दाखल

- Advertisement -

वनविभागाच्या जागेत झाडांची कत्तल करुन अतिक्रमण करणाऱ्या कंपनी विरोधात गुन्हा दाखल

भूषण गरुड : पुणे – पंतप्रधानांच्या सभेसाठी पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानात झाडांची कत्तल केल्याचा प्रकार ताजा असतानाच आता पुण्यातील करंदी (शिरुर) येथे झाडांची कत्तल करुन वनविभागाच्या जागेत अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी संकल्प इंजिनिअरिंग व कीर्तनलाल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करंदी गावाच्या पश्चिमेला संकल्प इंजिनिअरिंग या कंपनीचा प्लांट आहे. कंपनीच्या मागे डोंगराळ भाग असून इथं वनविभागाची मोठी जमीन आहे. संकल्प कंपनीला असलेला रस्ता साधा होता, मात्र कंपनीने आता याठिकाणी डांबरीकरण करुन पक्का रस्ता तयार केला आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी झाडांची कत्तल करण्यात आली असून बेकायदेशीर उत्खनन देखील केल्याचं पहायला मिळत आहे.

संकल्प इंजिनिअरिंगने कंपनीलगतच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे, मात्र ही पार्किंगची वादात सापडली आहे. वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करुन ही पार्किंग तयार करण्यात आली आहे. पर्यावरण मित्र संघटनेचे संघटक सागर वर्पे यांनी याप्रकरणी तहसीलदार शिरुर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे या प्रकाराची लेखी तक्रार करुन संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली होती.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेटू देऊन पंचनामा केला आहे. संकल्प कंपनीने केलेल्या कामाला तूर्तास स्थगिती देण्यात आली असून कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच झाडांची कत्तल केल्याप्रकरणी कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असं वनविभागाचे अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान,  स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, वनविभागाच्या या दिरंगाईनं जैवविविधतेचं कधीही न भरुन निघणारं नुकसान झाल्यानं संताप व्यक्त केला जातोय.

- Advertisement -