Home गुन्हा हुबळी रेल्वे स्टेशनमध्ये स्फोट एक जण जखमी

हुबळी रेल्वे स्टेशनमध्ये स्फोट एक जण जखमी

0

बेंगळूरु : उत्तर कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकात सोमवारी झालेल्या स्फोटात एक जण जखमी झाला. प्लॅटफॉर्मवर बेवारस असलेल्या बादलीमध्ये असलेला एक छोटा प्लास्टिकचा बॉक्‍स उचलल्यावर हा स्फोट झाला, असे पोलिसांनी सांगितले.

या बादलीवर चिकटवलेल्या एका घड्या पडलेल्या चिठ्ठीवर महाराष्ट्रातील शिवसेनेचे आमदार प्रकाशराव आबिटकर यांचे नाव हाताने लिहिलेले होते आणि काही पत्ते आणि ‘नो बीजेपी, नो एनएसयुआय, ओन्ली शिवसेना’ अशी घोषणाही लिहीली होती, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

या स्फोटामुळे एक जण जखमी झाला आणि जवळच्याच खोलीच्या खिडकीच्या काचा फुटल्या. हा स्फोट फार मोठा नव्हता, असेही अधिकाऱ्याने सांगितले. शिवसेनेच्या आमदाराचे नाव चिकटवलेले असल्याने कोणताही निष्कर्श काढता येत नाही. ही केवळ एक कुरापत असू शकते. या बादलीमध्ये काही प्लॅस्टिक बॉक्‍स होते, असे पोलिस अधिकाऱ्यांई सांगितले.

हुबळी हे एक मुख्य जंक्‍शन आणि दक्षिण पश्‍चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय असल्याने या स्फोटामुळे दहशत पसरली होती. घटनेची माहिती समजताच रेल्वे सुरक्षा दल आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण प्लॅटफॉर्म रिकामा करण्यात आला आणि संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. जखमी व्यक्‍तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली आहे. रेल्वे पोलिस सतर्कतेवर आहेत. उच्च अधिकाऱ्यांसह राज्य पोलिस घटनास्थळी आहेत. तपास सुरू आहे, असे दक्षिण पश्‍चिम रेल्वेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कर्नाटकचे मध्यम व मोठ्या उद्योगांचे मंत्री जगदीश शेट्टर हे हुबळी-धारवाड मध्य विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. ही स्फोटके रेल्वे स्थानकावर कोणी ठेवली हे चौकशीदरम्यान उघड होईल, असे त्यांनी सांगितले.