
- बेपत्ता नागरिकांच्या शोध व ओळखीसाठी केंद्र व राज्य यंत्रणांशी सातत्याने समन्वय
मुंबई, दि. १० : नेपाळ–तिबेट प्रदेशातील पूर आपत्तीमध्ये महाराष्ट्रातील नागरिक अडकले असल्याचे वृत्त प्राप्त होताच महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्र तातडीने २४x७ कार्यान्वित करण्यात आले. अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करणे, तिची पडताळणी करणे तसेच बचाव व मदतकार्याचा समन्वय साधण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत विविध स्तरांवर कार्यवाही करण्यात आली आहे असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.
नागरिकांची माहिती तातडीने संकलित करण्यासाठी वेब-आधारित लिंक विकसित करण्यात आली. तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती गोळा करून तिची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्राप्त अद्ययावत माहितीची यादी तात्काळ भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयासह संबंधित यंत्रणांना पाठविण्यात आली.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे नोंद असलेल्या ४०६ पर्यटकांपैकी ६७ नागरिकांचा अद्याप शोध लागलेला नसून, उर्वरित नागरिक महाराष्ट्रात सुखरूप परतले आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध, ओळख आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
यासाठी भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय, नेपाळ व चीनमधील भारतीय दूतावास, केंद्रीय फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, नवी दिल्ली, दूरसंचार विभाग तसेच बेपत्ता नागरिकांचे कुटुंबीय यांच्याशी सातत्याने समन्वय साधण्यात येत आहे.
बेपत्ता नागरिकांच्या ओळखीसाठी डीएनए नमुने संकलित
नेपाळ पूर दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची ओळख पटविण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या समन्वयाने DFSL, कालिना तसेच संबंधित जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माध्यमातून कुटुंबीयांचे DNA नमुने संकलित करण्यात आले आहेत. निर्धारित स्वरूपात DNA प्रोफाइल तयार करून हे नमुने Central Forensic Laboratory, नवी दिल्ली येथे पाठविण्यात आले आहेत.
मोबाईलचे ‘लास्ट नोन लोकेशन’ मिळविण्यासाठी दूरसंचार विभागाशी संपर्क
बेपत्ता नागरिकांच्या शोधकार्यात मदत व्हावी यासाठी नेपाळमध्ये बेपत्ता झालेल्या नागरिकांच्या मोबाईल फोनचे शेवटचे ज्ञात ठिकाण उपलब्ध करून देण्याची विनंती दूरसंचार विभागाला करण्यात आली आहे. यासंदर्भात ४ सप्टेंबर २०२६ रोजी दूरसंचार विभागाला पत्र पाठविण्यात आले आहे.
कुटुंबीयांशी थेट समन्वय
बेपत्ता नागरिकांच्या कुटुंबीयांसोबत व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या माहिती व तक्रारींचे राज्य तसेच केंद्र शासनाच्या स्तरावर तातडीने निराकरण करण्यासाठी समन्वय साधला जात आहे. नागरिकांकडून प्राप्त सर्व अनुषंगिक माहिती संबंधित यंत्रणांना तत्काळ कळविण्यात येत आहे.नागरिकांच्या मदतीसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून आवश्यक प्रेस नोटही प्रसिद्ध करण्यात आली आहे. बेपत्ता नागरिकांना शोधण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत मिळण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाच्या माध्यमातून नेपाळ सरकारकडेही विनंती करण्यात आली असून कार्यवाही केली जात आहे.
0000
किरण वाघ/विसंअ

WhatsApp