पुनर्वसनाचे प्रस्ताव एकत्रित तातडीने सादर करा – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

    - Advertisement -


    सातारा दि. 11: सुपने येथील पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून येत्या एका महिन्यात सर्व पुनर्वसन बाधितांना जमिनींचे प्रत्यक्ष वाटप करण्यात यावे, तसेच सुपने व वांग मराठवाडी पुनर्वसनाचे एकत्र प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात विविध प्रकल्पांच्या पुनर्वसनाचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    सुपने नवीन गावठाणाचा परिपूर्ण प्रस्ताव तातडीने तयार करून सादर करावा. तसेच गावातील रस्त्याचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थ आणि स्थानिक वहिवाटदार यांची संयुक्त बैठक आयोजित करून सामोपचाराने मार्ग काढण्यावर भर द्यावा. वांग मराठवाडी धरणाच्या बंधाऱ्यातून होणारी पाणीगळती रोखण्यासाठी खळे बांधण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा.

    यासोबतच मानेवाडी आणि भोसगाव येथील दुरुस्ती प्रस्ताव पाठवावे. वांग मराठवाडी बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामासाठी आवश्यक असणारा सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि हे सर्व दुरुस्तीचे काम पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असेही निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

    ००००

    - Advertisement -