
‘गुलजार ए रजा’ संस्थेची एटीएसमार्फत चौकशी सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १८ : गुलजार ए रजा या संस्थेशी संबंधित आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर बाबी समोर आल्याने या प्रकरणाची एटीएसमार्फत चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकरणाची मर्यादा केवळ धार्मिक कारणासाठी निधी जमा करण्यात आला एवढ्यावरच नसून तपासादरम्यान परदेशातील संस्थेकडून सुमारे २५ लाखांची रक्कम जमा झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित संस्थेची सर्व बँक खाती सील करण्यात आली असून आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी सुरू आहे. गेल्या चार वर्षांत सुमारे १८,५७३ देणगीदारांकडून चार जिल्ह्यांतील ४०० ड्रॉप बॉक्सद्वारे निधी जमा करण्यात आला असून सर्व देणगीदारांची माहिती उपलब्ध नसल्याने त्याची सखोल पडताळणी सुरू आहे. विविध खात्यांमधून रक्कम काढून इतरत्र वळवण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे. निधीचा वापर कोणत्या कारणांसाठी करण्यात आला, तसेच त्यामागील उद्देश काय होता, याची चौकशी केली जात आहे.
या प्रकरणातील प्रत्येक पैलू स्पष्ट करण्यासाठी एटीएसकडून समांतर तपास सुरू असून, आवश्यकतेनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
याबाबत अधिक माहिती देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, संबंधित संस्थेच्या नावाखाली विविध कारणे सांगून नागरिकांकडून सुमारे ४.७३ कोटींची रक्कम जमा करण्यात आली. ट्रस्ट माजलगाव येथे स्थापन करण्यात आला असला तरी बँक खाते लातूर येथील अॅक्सिस बँकेत उघडण्यात आले होते. या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी दोघांचा शोध सुरू आहे. ट्रस्टमार्फत आणखी कोणते गैरप्रकार झाले आहेत का, याची सखोल चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
0000
महावितरणच्या कामांतील गैरप्रकारांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.18 : नाशिक येथे महावितरणच्या कामांमध्ये तसेच खासगी कंत्राटदारांच्या संदर्भात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींची दखल घेण्यात आली असून, याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत सदस्य अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महावितरणची अधिकृत कामे आणि खासगी कंत्राटदारांकडून केली जाणारी कामे यामध्ये स्पष्ट फरक आहे. संबंधित कंत्राटदार महावितरणच्या यादीत नाही तसेच त्याला महावितरणकडून कोणतेही अधिकृत काम देण्यात आलेले नाही. मात्र, खासगी कामांच्या संदर्भात पदाचा गैरवापर करून कामे मिळवून देणे किंवा परवानग्यांमध्ये अनियमितता होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. विजेच्या चोरीसंदर्भात प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून, पुढेही गरज भासल्यास गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
0000
शैलजा पाटील/वि.सं.अ
आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १८ : आराजी असलेल्या शेत जमिनीबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी आराजी असलेली वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली.
सदस्य सचिन अहिर यांनी या विषयी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मौजा भिवी ( ता. भिवापूर जि.नागपूर) येथील सर्वोदय सहकारी सामुदायिक शेती सोसायटीच्या नावावर असलेल्या आराजी जमिनीचे वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरण व्यवहार प्रकरण २०२२ मध्ये घडले. या प्रकरणाची तक्रार २०२५ मध्ये करण्यात आली. तक्रारीनुसार या व्यवहाराची चौकशी करण्यात येत असून कायदेशीर मार्गाने रक्कम वसूल करून संबंधित शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात आराजी असलेली शेत जमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करणे या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आले असून सुमारे १३ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
००००
टाकळी ढोकेश्वर सौर ऊर्जा प्रकल्पामुळे २,०३३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.१८ : टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर जि. अहिल्यानगर) येथे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी टाकण्यात आलेल्या लाईनचा लाभ या परिसरातील शेतकऱ्यांना होत असून या प्रकल्पामुळे २०३३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली.
सदस्य सत्यजित तांबे यांनी या विषयी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पारेषणच्या लाईन्सखाली शेती करणे अवघड ठरत असल्याने संबंधित शेतकऱ्यांची परवानगी घेऊन त्यांना जोखमीच्या मोबदल्यापोटी सुमारे ३० टक्क्यांपर्यंत भरपाई दिली जात आहे. वितरण लाईन्स बाबत मात्र वेगळी तरतूद असून ही लाइन टाकताना स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पारगाव परिसरातील जमिनीबाबतही प्रशासनास सूचना देण्यात येत असून आवश्यकतेपेक्षा अधिक घेतलेली जमीन परत देण्याबाबत आदेश दिले जातील. तसेच सामाजिक वनीकरण विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या समन्वयातून या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात येईल.
0000
केईएम, नायर, कूपरमध्ये जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य विभाजन – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि.१८ : मुंबईतील केईएम, नायर आणि कूपर रुग्णालयात जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य विभाजन (सेग्रिगेशन) व प्रक्रिया यावर भर देण्यात आला असून या रुग्णालयात सेग्रिगेशनची प्रक्रिया व्यवस्थित सुरू असल्याची माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी या विषयी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.
पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, शासकीय रुग्णालयांमध्ये पर्यावरणपूरक आणि आधुनिक सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली उभारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मुंबईतील प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन व पर्यावरणीय निकषांचे पालन होण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जात आहे.
महापालिकेच्या रुग्णालयात ईटीपी, एसटीपी प्रकल उभारणीबाबत प्रशासनाकडून सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षणाच्या अहवालानंतर याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असेही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
००००
पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांना नोटीस – मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि. १८ : चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या औद्योगिक प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर विविध उद्योगांवर कारवाई करण्यात आली आहे. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांना नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत सदस्य अभिजीत वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रदूषण कमी करण्यासाठी तांत्रिक सुधारणा, धूळ नियंत्रण, स्वच्छता उपाययोजना आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यावर शासनाचा भर आहे. चंद्रपूरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी स्वतः भेट देणार असल्याचेही मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत नियमित पाहणी करण्यात येत असून, पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींवर नियमांनुसार कडक कारवाई केली जाते.
मंडळाकडून उद्योगांची वेळोवेळी तपासणी करून पर्यावरणीय नियमांचे पालन होत आहे की नाही, याची पडताळणी केली जाते. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. तसेच आवश्यकतेनुसार अंतरिम निर्देश व प्रस्तावित निर्देश जारी करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
0000
सातारा जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात घट; पोलीस प्रशासन सजग, सतर्क – गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
मुंबई, दि. १८ : सातारा जिल्ह्यात गंभीर गुन्हेगारीच्या प्रमाणात घट होत आहे. सन २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सजग असून या विषयी सतर्कतेने काम करत असल्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारीतील वाढ या विषयी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सचिन अहिर यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
गृह राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, सातारा शहर व जिल्ह्यात सन २०२४ मध्ये ३१८ गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली होती तर २०२५ मध्ये १९४ गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सातारा शहरात २२ जानेवारी २०२६ रोजी घडलेल्या हत्या घटना प्रकरणातील १५ आरोपींपैकी ११ जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे.
सातारा जिल्ह्यातील ज्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यात आली होती त्या तक्रारींची पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत चौकशी करण्यात आली होती. तथापि, विधिमंडळ सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीत जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
००००
परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द – गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
मुंबई, दि. १८ : परवानगीशिवाय हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास संबंधितांचे परवाने रद्द करण्यात येतील. अशी घटना ज्या क्षेत्रामध्ये घडेल त्या क्षेत्रातील पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य दादाराव केचे यांनी आर्वी (जि.वर्धा) तालुक्यातील हॉटेलमधील अवैध व्यवसायाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे यांनीही सहभाग घेतला.
गृह राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, आर्वी (जि.वर्धा) तालुक्यातील हॉटेलमधील अवैध व्यवसाय तक्रारींच्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्यात आली असून कोणताही गैरप्रकार आढळला नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तरीही लोकप्रतिनिधींच्या सूचनांची पुन्हा दखल घेत या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येईल. ही चौकशी अतिरिक्त पोलिस अधीक्षकांमार्फत केली जाईल. या चौकशीत कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी दिली.
०००००
वाहतूक नियम भंग; ई-चलनद्वारेच दंड आकारणी – गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
मुंबई, दि. १८ : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करताना पारदर्शकता राखली जात असून ई-चलन प्रणालीद्वारेच ऑनलाइन दंड आकारला जात असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य निरंजन डावखरे यांनी याविषयी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला.
गृह राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, महानगरपालिकांनी पार्किंगसाठी जागा निश्चित केलेल्या असतात. या ठिकाणी पार्किंग न करता चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस यांच्याकडून तत्काळ कारवाई केली जाते. या ठिकाणी वाहनमालक उपस्थित नसल्यास संबंधित वाहन टोइंगद्वारे उचलण्यात येते आणि नंतर नियमानुसार दंड आकारला जातो. मात्र कोणत्याही प्रकरणी अनधिकृत पद्धतीने दंडाची वसुली केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी यावेळी केले.
०००
एकनाथ पोवार/स.सं






















WhatsApp