
२१ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात ‘जागतिक वनीकरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकारातून साजरा होणाऱ्या या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे वनांचे महत्त्व समजावून सांगणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि ढासळणारा पर्यावरणीय समतोल टिकवण्यासाठी मानवाला प्रेरित करणे हा आहे. आजच्या काळात जेव्हा सिमेंटची जंगले वाढत आहेत, तेव्हा सांगली जिल्ह्यात वसलेले यशवंतराव चव्हाण वन्यजीव सागरेश्वर अभयारण्य हे निसर्ग संवर्धनाचे जणू प्रत्यक्ष आणि आदर्श उदाहरण म्हणून जगासमोर उभे आहे.

सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य हे निसर्गसौंदर्य, सांस्कृतिक वारसा आणि मानवी परिश्रमांचा एक अद्भुत संगम आहे. या अभयारण्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, इतर अभयारण्यांप्रमाणे हे नैसर्गिकरीत्या विकसित झालेले नाही. तर ते परिसरातील लोकांनी एकत्र येत निर्माण केलेले भारतातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे. एकेकाळी या परिसरात केवळ उघड्या-बोडक्या टेकड्या आणि ओसाड माळरान होते. मात्र, वृक्षमित्र धों. म. मोहिते यांनी आपल्या अथक प्रयत्नातून या ओसाड माळरानाचं नंदनवनात रूपांतर करण्याची किमया केली.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण वृक्षलागवडीमुळे आज येथे १०.८७ चौरस किलोमीटरवर पसरलेली समृद्ध वनसंपदा निर्माण झाली आहे.
कडेगाव, वाळवा आणि पलूस या तीन तालुक्यांच्या संगमावर वसलेले हे अभयारण्य आज निसर्गप्रेमी आणि वन्यजीव निरीक्षकांसाठी एक नंदनवन ठरत आहे. येथे गवताळ टेकड्या, कोरड्या पानगळीचे जंगल आणि मोकळी कुरणे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, इतर अभयारण्यांप्रमाणे येथे कोणतेही बारमाही नैसर्गिक जलस्रोत नाहीत. असे असूनही, मानवी नियोजनाच्या जोरावर येथे चिंच, कडुलिंब, निलगिरी, बाभूळ, साग, खैर, पळस आणि बहावा अशा अनेक वृक्षप्रजातींची यशस्वी जोपासना करण्यात आली आहे.
या हिरव्यागार आच्छादनामुळेच आज येथे वन्यजीवांचा मोठा राबता आहे. सांबर, काळवीट, चितळ आणि मंटजॅक (रानमांजर) यांसारख्या हरणांच्या विविध प्रजाती येथे मुक्तपणे वावरताना दिसतात. त्यांच्यासोबतच रानडुक्कर, कोल्हा, तरस आणि साळींदर यांसारख्या प्राण्यांचे दर्शन वन्यजीव निरीक्षणाचा अनुभव अधिक रोमांचक बनवते. केवळ प्राणीच नव्हे, तर रंगीबेरंगी मोर आणि विविध प्रकारचे पक्षी पक्षीनिरीक्षकांना भुरळ घालतात. या परिसरात विविध प्रकारचे सर्प आणि फुलपाखरांचीही मोठी संख्या असून, ते या नाजूक पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात. पावसाळ्यात जून ते सप्टेंबर – ऑक्टोबर पर्यंत निसर्गाचे सौंदर्य पहाण्यासाठी भेट देण्यासाठी सोयीस्कर काळ आहे.
आज वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि जंगलतोड यामुळे हवामान बदल आणि तापमान वाढ यांसारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सागरेश्वर अभयारण्याचे उदाहरण अत्यंत अनुकरणीय आहे. निसर्गाशी असलेले आपले नाते जपण्याची आणि भावी पिढ्यांसाठी हिरवेगार भविष्य निर्माण करण्याची हीच खरी वेळ आहे. केवळ शासनावर अवलंबून न राहता, सामान्य नागरिकांनीही वृक्षारोपण करणे, झाडांचे संरक्षण करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे आवश्यक आहे. तरच आपले जीवन अधिक समृद्ध आणि सुरक्षित राहू शकते.
००००
संकलन – संप्रदा बीडकर
जिल्हा माहिती अधिकारी, सांगली






















WhatsApp