अ‍ॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी काढणे बंधनकारक – जिल्हा माहिती अधिकारी हेमंतकुमार चव्हाण – महासंवाद

    - Advertisement -

    सातारा दि. २२ : महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात अ‍ॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये खातेदार असणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यावर त्यांना फार्मर आयडी (शेतकरी नोंदणी क्रमांक) मिळणार आहे. अद्याप ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला नसेल त्यांनी तो त्वरित काढून घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी हेमंतकुमार चव्हाण यांनी केले आहे.

    माण तालुक्यातील डंगीरेवाडी येथील महात्मा फुले गणेशोत्सव मंडळ येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने लोकसंवाद-२०२६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष युवराज राऊत, सत्यवान राऊत यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कृषी विषयक योजना जसे की पीक विमा, फळपीक विमा योजना, नैसर्गिक आपत्ती पीक नुकसान भरपाई, पी एम किसान योजना इत्यादींचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच केंद्र शासनाने पी. एम. किसान योजनेमधील लाभार्थ्यांना अ‍ॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. याशिवाय पी.एम. किसान पोर्टलवर नवीन स्वयंनोंदणी करण्यासाठी देखील अ‍ॅग्रीस्टॅकमधील फार्मर आयडी बंधनकारक केला आहे.

    फार्मर आयडीसाठी शेतकऱ्यांना mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर स्वतः नोंदणी करता येणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी या पोर्टलचा वापर करून आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.

     

    ००००

    - Advertisement -