
नाशिक, दि. २७ (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यातील राजापूर येथे दुष्काळसदृश्य परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून खरीप पिकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाचे प्रमाण, पावसातील खंड, पिकांची वाढ तसेच पाण्याच्या उपलब्धतेबाबत माहिती जाणून घेतली.
यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाड उपविभागीय कृषी अधिकारी बटू पाटील, तहसीलदार आबा महाजन, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, ग्राम महसूल अधिकारी सविता धीवर, ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत बोरसे, मंडळ अधिकारी गणेश लाडेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
राजापूर परिसरात पावसातील खंडामुळे पिकांवर रोग पडून झालेले नुकसान आणि शेतीसमोरील अडचणींची पाहणी मंत्री भुजबळ यांनी केली. शेतकऱ्यांनी पिकांची सद्यस्थिती, पाण्याची उपलब्धता आणि संभाव्य नुकसानीबाबत त्यांच्या अडचणी मांडल्या. मंत्री भुजबळ यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांकडूनही परिस्थितीची माहिती घेतली.
पावसातील खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री भुजबळ यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. तसेच शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार उपलब्ध होणाऱ्या विविध सवलती व मदतीबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तत्पर राहावे, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
०००००

WhatsApp