शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही; शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – मंत्री गिरीश महाजन – महासंवाद

    - Advertisement -

    जिल्ह्याच्या दुष्काळी प्रश्नावर कायमस्वरूपी व शाश्वत उपाययोजनांची गरज
    -पालकमंत्री जयकुमार रावल

    धुळे, दि. २७ सप्टेंबर, २०२६ (जिमाका वृत्त) : पावसाने तब्बल ४० ते ५० दिवस दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत उभी पिके करपली आहेत. अनेकशेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या संकटाच्या काळात राज्य शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. नुकसानीचे पंचनामे वेगाने पूर्ण करून आवश्यक मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. महाजन आणि राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज धुळे तालुक्यातील फागणे व मुकटी परिसरात थेट शेतांच्या बांधावर जाऊन दुष्काळामुळे नुकसान झालेल्या कपाशी, मका, सोयाबीन व अन्य पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांचे झालेले नुकसान, उत्पादनावर झालेला परिणाम तसेच पुढील काळातील पाणी व चाऱ्याच्या संभाव्य समस्यांची माहिती जाणून घेतली.यावेळी आमदार राघवेंद्र भदाणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, तहसीलदार अरुण शेवाळे, अपर तहसीलदार वैशाली हिंगे, रामकृष्ण खलाणे, मुंबई बाजार समितीचे सदस्य रावसाहेब गिरासे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंकज कदम यांच्यासह संबंधित अधिकारी, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. शेतातील नुकसान प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मंत्री श्री. महाजन म्हणाले, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि
    विदर्भातील अनेक भागांत पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. साडेतीन ते चार महिन्यांपूर्वी मोठ्या आशेने लावलेली कपाशी, सोयाबीन आणि मक्याची पिके पाण्याअभावी उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे भरलेले नाहीत, तर मक्याची स्थिती इतकी बिकट झाली आहे की त्याचा चाराही जनावरांना खाण्यायोग्य राहिलेला नाही. वर्षभराच्या उत्पन्नाची आशा असलेली पिके डोळ्यांदेखत करपल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

    “शेतकऱ्याच्या शेतातील हे नुकसान केवळ पिकांचे नुकसान नाही. त्यामागे त्याचे वर्षभराचे कष्ट, कुटुंबाच्या अपेक्षा आणि भविष्यातील स्वप्ने जोडलेली आहेत. या संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी शासन पूर्ण ताकदीने त्याच्या पाठीशी उभे राहील,” असे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन शासनाने दुष्काळी परिस्थितीबाबत निर्णय घेतला असून संबंधित यंत्रणांना प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. धुळे व जळगावसारख्या जिल्ह्यांतील गंभीर परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दिलासा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मागील नैसर्गिक आपत्तींच्या काळात ज्या पद्धतीने निकषांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात आली, त्याच संवेदनशीलतेने याही संकटात मदत केली जाईल, असे श्री. महाजन यांनी स्पष्ट केले.

    पुढील सात ते आठ महिन्यांचा काळ अधिक आव्हानात्मक राहणार असल्याचे नमूद करून श्री. महाजन म्हणाले, पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणे, तलाव आणि उपलब्ध जलस्रोतांमधील पाण्याचे काटेकोर नियोजन करून पिण्याच्या पाण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन चाऱ्याची उपलब्धता तसेच आवश्यकतेनुसार चारा छावण्यांचे नियोजन आतापासूनच करावे लागेल. सर्व संबंधित यंत्रणांनी पूर्णपणे सतर्क राहून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्याच्या दुष्काळी प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक.

    पालकमंत्री जयकुमार रावल यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले, धुळे जिल्हा हा सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे प्रत्येक वेळी पाणीटंचाई आणि दुष्काळ निर्माण झाल्यानंतर तात्पुरत्या उपाययोजना करण्याऐवजी या समस्येवर कायमस्वरूपी आणि शाश्वत तोडगा काढण्याची गरज आहे.
    पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर धुळे जिल्ह्यातही व्यापक जलसंधारणाची कामे मिशन मोडवर हाती घेणे आवश्यक आहे. लहान-मोठे बंधारे, जलसाठ्यांचे बळकटीकरण, नाला खोलीकरण व रुंदीकरण, पाणलोट क्षेत्र विकास, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि भूजल पुनर्भरण यांसारख्या कामांना व्यापक स्वरूप देण्याची गरज आहे. यासाठी शासनस्तरावर आवश्यक पाठपुरावा करून धुळे जिल्ह्याच्या दुष्काळी समस्येवर दीर्घकालीन व शाश्वत उपाययोजना करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले.

    “दुष्काळ पडल्यानंतर उपाययोजना करणे एवढ्यावर न थांबता, भविष्यात दुष्काळाची तीव्रता कमी कशी करता येईल, प्रत्येक थेंब पाणी जमिनीत कसे मुरेल आणि शेतकऱ्याला वर्षभरासाठी पाण्याची शाश्वत उपलब्धता कशी निर्माण करता येईल, याचा विचार करणे आवश्यक आहे. धुळे जिल्ह्यासाठी व्यापक जलसंधारणाचा दीर्घकालीन आराखडा तयार करण्याची गरज आहे,” असे श्री. रावल यांनी नमूद केले. दुष्काळी परिस्थितीत पाणी, चारा, शेती आणि रोजगार या चारही बाबींचे पुढील काळासाठी सूक्ष्म नियोजन प्रशासनाने करावे. शासनाने जाहीर केलेल्या सर्व सवलती व मदत प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत वेळेत पोहोचली पाहिजे. पंचनाम्यांपासून प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत प्रशासनाने शेतकऱ्यांसोबत राहून संवेदनशीलतेने काम करावे,अशा सूचनाही पालकमंत्री श्री. रावल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

    पाहणीदरम्यान मंत्र्यांनी करपलेली कपाशी, दाणा न भरलेल्या सोयाबीनच्या शेंगा आणि वाळून गेलेल्या मक्याची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांनी पीक उभे करण्यासाठी केलेला खर्च, कर्जाचा वाढलेला भार आणि निर्माण झालेली आर्थिक चिंता मंत्र्यांसमोर मांडली. मंत्र्यांनी त्यांचे म्हणणे संवेदनशीलपणे ऐकून घेत प्रशासनाला नुकसानीची वस्तुनिष्ठ आणि अचूक नोंद घेण्याच्या सूचना दिल्या.
    “आज संकट मोठे आहे; मात्र या संकटात शेतकरी एकटा नाही. पंचनाम्यापासून मदतीपर्यंत आणि तातडीच्या दिलाशापासून भविष्यातील शाश्वत उपाययोजनांपर्यंत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असा विश्वास यावेळी मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.

    ००००

    - Advertisement -