दुष्काळ जाहीर झाला; आता प्रत्येक बाधित शेतकऱ्याच्या अश्रूंना दिलासा देण्याची वेळ -विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर – महासंवाद

    - Advertisement -

    धुळे, दि. २७ (जिमाका) : शेतात उभे असलेले करपलेले पीक म्हणजे केवळ पिकाचे नुकसान नसते; त्यामागे शेतकऱ्याचे वर्षभराचे कष्ट, कुटुंबाची स्वप्ने, मुलांच्या शिक्षणाच्या अपेक्षा आणि उद्याच्या जगण्याची चिंता दडलेली असते. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वास्तवदर्शी पंचनामे करून त्यांना योग्य नुकसानभरपाई व आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या प्रश्नांवर विधिमंडळातही संवेदनशीलतेने सखोल चर्चा घडवून आणण्याची आपली जबाबदारी पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज धुळे तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करताना शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली.

    दुष्काळ घोषित झाल्यानंतर आता शासनाच्या मदतीचा हात प्रत्यक्षात प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचला पाहिजे, या भूमिकेतून विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी गोंदूर, निमडाळेसह धुळे तालुक्यातील विविध पंचक्रोशीतील गावांमध्ये थेट शेतात जाऊन कापूस, मका आणि अन्य पिकांची पाहणी केली. उन्हाने आणि पाण्याअभावी कोमेजलेल्या पिकांच्या रांगा, मातीतच अडकलेली शेतकऱ्याची गुंतवणूक आणि डोळ्यांसमोर कमी होत चाललेले अपेक्षित उत्पन्न पाहताना त्यांनी शेतकऱ्यांशी अत्यंत आत्मीयतेने संवाद साधला.

    काही शेतकऱ्यांनी हातात आलेल्या पिकाची अवस्था दाखवली, काहींनी कर्जाची चिंता व्यक्त केली, तर काहींनी “आता पुढचा हंगाम कसा उभा करायचा?” असा थेट प्रश्न उपस्थित केला. विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी प्रत्येकाचे म्हणणे संयमाने ऐकून घेतले. त्यांच्या वेदना केवळ निवेदनातील ओळी नसून त्या कुटुंबाच्या जगण्याशी निगडित आहेत, याची जाणीव ठेवून प्रशासनाने काम केले पाहिजे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

    “दुष्काळ जाहीर होणे हा या प्रक्रियेचा शेवट नाही, तर मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याची खरी सुरुवात आहे. पंचनाम्यात प्रत्येक बाधित क्षेत्राचे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीचे वास्तव प्रतिबिंबित झाले पाहिजे. एकही पात्र शेतकरी केवळ तांत्रिक बाबींमुळे मदतीपासून वंचित राहू नये,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी महसूल आणि कृषी यंत्रणेला दिल्या.

    उत्तर महाराष्ट्रातील दौऱ्यात विविध भागांतील शेतात जाऊन कापूस, मका व इतर पिकांचे झालेले नुकसान आपण प्रत्यक्ष पाहिले असल्याचे सांगून विधानसभा अध्यक्ष ॲड.नार्वेकर म्हणाले की, अनेक ठिकाणी परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. शेतकऱ्याने बी-बियाणे, खते, औषधे, मजुरी यासाठी केलेला खर्च आणि त्यानंतर पावसाअभावी हातातून निसटलेले पीक यामुळे त्याच्यावर आर्थिक आणि मानसिक ताण निर्माण झाला आहे. अशा वेळी प्रशासनाने कागदी प्रक्रिया म्हणून नव्हे, तर संकटात सापडलेल्या कुटुंबाला आधार देण्याच्या भावनेतून पंचनामे करणे आवश्यक आहे.

    धुळे शहरालगतच्या काही भागांतील शेतकऱ्यांनी दुष्काळी लाभाच्या संदर्भातील अडचणी विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या. शहर परिसरातील पाच किलोमीटरच्या आतील काही बाधित शेतकऱ्यांची नावे लाभाच्या यादीत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल माहिती प्रशासनाकडून मागवून लागू निकषांच्या आधारे पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

    शेताच्या बांधावर उभे राहून शेतकऱ्यांशी बोलताना ते म्हणाले, “पिकाच्या प्रत्येक सुकलेल्या पानामागे शेतकऱ्याचा घाम आहे. हा घाम वाया जाऊ नये आणि संकटाच्या काळात त्याला आपण एकटे सोडणार नाही, हा विश्वास शासन आणि प्रशासनाने आपल्या कृतीतून निर्माण केला पाहिजे. त्यासाठी नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन आणि मदतीची प्रभावी अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची आहे.”

    दुष्काळी मदतीबाबत विविध स्तरांवरून होत असलेल्या मागण्यांच्या संदर्भात त्यांनी सांगितले की, सध्या पंचनामे व नुकसानीचे मूल्यांकन सुरू आहे. या प्रक्रियेनंतर वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होईल. शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक त्या बाबी शासनापर्यंत ठामपणे मांडल्या जातील. नुकसानभरपाई, पीक कर्ज, वीज, पिण्याचे पाणी, चारा, रोजगार तसेच अन्य दुष्काळी सुविधांबाबत शेतकऱ्यांचे प्रश्न विधिमंडळाच्या व्यासपीठावरही प्रभावीपणे मांडले जातील.

    शेतकरी संकटात असताना त्याच्या पाठीशी उभे राहणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून ती शासन व्यवस्थेची संवेदनशील बांधिलकी आहे, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी नमूद केले. शासनाने यापूर्वीही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध निर्णय घेतले असून, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही शेतकरी हिताचे निर्णय प्राधान्याने घेण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    दुष्काळामुळे कोरड्या पडलेल्या मातीतून चालत, नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत आणि शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकत दुष्काळ जाहीर झाला आहे; आता मदत केवळ शासन निर्णयात न राहता ती शेतकऱ्याच्या हातात, त्याच्या घरापर्यंत आणि त्याच्या उद्याच्या आशेपर्यंत पोहोचली पाहिजे. झालेल्या या दौऱ्यात विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची ही थेट भावना यावेळी प्रकर्षाने समोर आल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

    यावेळी माजी आमदार कुणाल पाटील, तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती योगेश पाटील, उपसभापती संभाजी राजपूत, रायबा कुणाल पाटील, हर्षल साळुंखे, प्रभाकर भामरे, प्रांताधिकारी रोहन कुंवर, कृषी उपसंचालक प्रज्ञा पवार यांच्यासह विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

     

    ००००

    - Advertisement -