
- नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग, दि. ३० : महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यांच्या संयुक्त समन्वयातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात संवेदनशील ठिकाणी १ ऑक्टोबर रोजी बहुराज्यीय चक्रीवादळ रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. या संयुक्त सरावातून चक्रीवादळ आणि त्यातून उद्भवणाऱ्या आपत्तीच्या प्रसंगी विविध यंत्रणांमध्ये समन्वय, प्रतिसाद क्षमता, बचाव व मदतकार्याची तयारी तसेच घटना प्रतिसाद प्रणालीची परिणामकारकता तपासणे हा उद्देश आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एमएसडीएमए), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए), जिल्हा प्रशासन तसेच विविध आपत्ती प्रतिसाद यंत्रणांच्या संयुक्त समन्वयातून ही रंगीत तालीम आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली, आचरा, रेडी पोर्ट, श्रीरामवाडी, शेर्ली, विजयदुर्ग आणि तांबळखेडा या सात ठिकाणी विविध शासकीय विभाग, आपत्ती प्रतिसाद दल, आरोग्य यंत्रणा, पोलिस, अग्निशमन सेवा, बंदर विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, स्थानिक प्रशासन तसेच इतर राज्य व केंद्रस्तरीय यंत्रणांच्या सहभागातून प्रत्यक्ष सराव करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सहसचिव मुग्धा पुरी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी जिल्ह्यातील आपत्तीपूर्व तयारी, उपलब्ध साधनसामग्री, मनुष्यबळ, निवारा केंद्रे, स्थलांतर व्यवस्था आणि समन्वय यंत्रणेबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून संबंधित माहिती अवगत केली.
रंगीत तालीममध्ये अतितीव्र चक्रीवादळाची परिस्थिती गृहीत धरून किनारी, खाडी आणि नदीनमुख परिसरात समुद्राच्या पाण्याची पातळी सुमारे तीन मीटरपर्यंत वाढणे, तसेच २४ ते ३६ तासांत ७५ ते २०० मिलिमीटर पर्जन्यमान होणे अशी काल्पनिक परिस्थिती निर्माण करण्यात येणार आहे. या परिस्थितीत नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, शोध व बचाव कार्य, मच्छीमार व नौकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना, वैद्यकीय प्रतिसाद व आपत्कालीन आरोग्य सेवा, तात्पुरत्या निवारा केंद्रांचे व्यवस्थापन, वाहतूक व गर्दी नियंत्रण, वीज, पाणीपुरवठा आणि दूरसंचार सेवा पुनर्संचयित करण्याची तयारी यांचा सराव केला जाणार आहे.तसेच विविध विभागांमधील समन्वय आणि नियंत्रण प्रणालीची कार्यक्षमता तपासली जाणार असून, संबंधित ठिकाणी इन्सिडेंट कमांड पोस्ट, स्टेजिंग एरिया, रिलीफ कॅम्प, मेडिकल एड पोस्ट यांसारख्या सुविधा कार्यान्वित करून घटना प्रतिसाद प्रणालीची चाचणी घेण्यात येणार आहे. ही रंगीत तालीम प्रत्यक्ष चक्रीवादळाची पूर्वसूचना नसून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या सज्जतेची चाचणी घेण्यासाठी आयोजित नियोजित सराव असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तालीमदरम्यान विविध ठिकाणी बचाव पथके, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने, पोलीस, नौका आणि इतर आपत्कालीन संसाधनांची हालचाल दिसून येईल. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भिती न बाळगता प्रशासनास सहकार्य करावे. तसेच अफवा, अप्रकाशित संदेश किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये. रंगीत तालीमेसंदर्भातील अधिकृत माहिती केवळ प्रशासन आणि अधिकृत शासकीय माध्यमांद्वारेच प्रसारित केली जाईल.
चक्रीवादळासारख्या आपत्तीच्या काळात वेळेत स्थलांतर, जीवितहानी टाळणे आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग व सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी प्रशासन, पोलिस, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि इतर संबंधित यंत्रणांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग फोन : (०२३६२) २२८८४७
जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग फोन : (०२३६२) २२८६१४
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र SEOC. टोल-फ्री आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक: १०७० (१०७०) दूरध्वनी क्रमांक: ०२२-२२०२७९९० किंवा +९१-९३२१५८७१४३
0000
किरण वाघ/विसंअ

WhatsApp