भाषा हे विवादाचे नव्हे, तर सुसंवाद साधण्याचे माध्यम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ३० : भाषा हे विवादाचे माध्यम नसून सुसंवाद, समन्वय आणि समाजाला जोडण्याचे प्रभावी साधन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    ‘पाञ्चजन्य’च्या वतीने मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सुशासन संवाद : मुंबई संकल्प’ या कार्यक्रमात पाञ्चजन्यचे संपादक हितेश शंकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी महाराष्ट्रासह देशातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण, कृषी, रोजगार आणि विकासाशी संबंधित विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांनी मनमोकळा संवाद साधला.

    पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणावर भर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले बदलत्या हवामानाचे परिणाम गेल्या काही वर्षांत अधिक प्रकर्षाने जाणवत आहेत. त्यामुळे पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी राज्य शासनासोबतच समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देणे आवश्यक आहे.

    ऊर्जा क्षेत्रात स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढविण्यावर शासनाचा भर आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मितीचा वाटा वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. हवामान बदलाचे परिणाम आणि प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्यास पर्यावरणाशी संबंधित अनेक समस्या दूर करता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

    जमिनीची उत्पादकता टिकविणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि जलप्रदूषण रोखणे ही आगामी काळातील महत्त्वाची आव्हाने आहेत. जलस्रोतांमध्ये प्रदूषित पाणी जाणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

    जलव्यवस्थापनातून दुष्काळग्रस्त भागांना पाणी

    महाराष्ट्रातील पाण्याची उपलब्धता आणि भौगोलिक स्थिती यामध्ये असलेला असमतोल दूर करण्यासाठी दीर्घकालीन जलव्यवस्थापनावर भर देण्यात येत आहे. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून दुष्काळग्रस्त भागांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकल्पांचे नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

    विदर्भातील वैनगंगा नदीचे समुद्राकडे वाहून जाणारे पाणी जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागांकडे वळविण्याच्या दृष्टीने वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे बुलढाणा तसेच विदर्भातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    पश्चिम घाटातून पश्चिमवाहिनी नद्यांद्वारे समुद्रात जाणाऱ्या पाण्याचा अधिक प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात येत आहे. अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागांकडे वळवून सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. असेही त्यांनी सांगितले

    पूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांवर जलव्यवस्थापनातून उपाय

    महाराष्ट्रातील काही भागांना वारंवार पूरस्थितीचा सामना करावा लागतो, तर दुसऱ्या बाजूला अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई जाणवते. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा दुष्काळग्रस्त भागांसाठी उपयोग करण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

    पूरस्थितीत उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी जलाशयांमध्ये वळविणे, नदीजोड प्रकल्प तसेच सिंचनाच्या माध्यमातून त्याचा उपयोग करणे यासाठी विविध उपाययोजनांवर काम सुरू आहे. या प्रकल्पांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून, दीर्घकालीन जलव्यवस्थापनातून महाराष्ट्रातील दुष्काळाची समस्या कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

     

    दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना तातडीने मदत

    अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळावी, यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नियमानुसार केंद्र शासनाकडे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीअंतर्गत (एनडीआरएफ) मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येतात. पात्र लाभार्थ्यांना मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया राबविण्यात येते.शेतकऱ्यांना सिंचन सुविधा, वीज उपलब्धता आणि आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

     

    योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेवर भर

    शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने पोहोचविण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत आहे. आधारआधारित पडताळणी, ई-केवायसी आणि थेट लाभ हस्तांतरणामुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता वाढण्यास मदत होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

    लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत ठेवणे आणि पात्र लाभार्थ्यांनाच योजनांचा लाभ मिळणे यासाठी आवश्यक पडताळणी प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

     

    सुशासनातून विकासाला गती

    सुशासन हे केवळ प्रशासनाच्या कार्यपद्धतीपुरते मर्यादित नसून नागरिकांना वेळेत, पारदर्शक आणि परिणामकारक सेवा उपलब्ध करून देणे हा त्याचा महत्वाचा भाग आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सक्षम प्रशासन आणि दीर्घकालीन नियोजनाच्या माध्यमातून विकासाला गती देण्यावर शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

     

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एन. एच. (नाना)पालकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एन. एच. (नाना)पालकर लिखित  ‘मॅन ऑफ दि मिलेनिया डॉ. हेडगेवार’  या पुस्तकाचे प्रकाशन  करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

    ‘सुशासन संवाद : मुंबई संकल्प’ या कार्यक्रमाला अभिनेते व खासदार रवि किशन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली.सुशासन संवाद कार्यक्रमात सुशासन, विकास, अर्थव्यवस्था, संस्कृती, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक परिवर्तनाच्या विविध पैलूंवर विचारमंथन करण्यात आले.

    0000

    योगेश मोरे/उपसंपादक

    - Advertisement -