
मुंबई, दि. 2 : ग्रामीण भागातील स्थानिक कौशल्य, कष्टकरी मनुष्यबळ आणि उपलब्ध संसाधनांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राच्या माध्यमातून केले जात आहे, असे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी सांगितले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांसाठी झालेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही विशेष मुलाखत मंगळवार, दि. 6 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच ही मुलाखत महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही उपलब्ध होणार आहे. याचबरोबर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत दि. 6 ते 10 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सकाळी 7.25 वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘News on AIR’ या ॲपवरून प्रसारित करण्यात येणार आहे. निवेदिका अवंती देसाई यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाची अधिकृत समाजमाध्यमे :
X (Twitter) : MahaDGIPR
Facebook : MahaDGIPR
YouTube : MaharashtraDGIPR
खादी ही केवळ वस्त्राची संकल्पना नसून स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा आणि ग्रामीण आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. बदलत्या काळानुसार खादी व ग्रामोद्योग क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनांमध्ये विविधता, आकर्षक डिझाईन, सौरऊर्जेचा वापर तसेच डिजिटल माध्यमातून विक्री यांसारख्या नव्या संधींचा स्वीकार करण्यात येत आहे, असे श्री. साठे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील कारागीर, महिला, युवक आणि ग्रामीण उद्योजकांना खादी व ग्रामोद्योगाच्या माध्यमातून विविध व्यवसाय आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. स्थानिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देणे, उत्पादनांची गुणवत्ता वाढविणे आणि बदलत्या ग्राहकांच्या गरजांनुसार उत्पादनांमध्ये आवश्यक बदल करणे, यावरही भर देण्यात येत असल्याचे त्यांनी या मुलाखतीतून स्पष्ट केले.
स्वदेशीचा विचार हा केवळ स्थानिक वस्तूंच्या वापरापुरता मर्यादित नसून स्थानिक कौशल्य, स्थानिक श्रम आणि स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देत आत्मनिर्भर समाजाच्या निर्मितीस हातभार लावण्याचा व्यापक विचार आहे. या दृष्टिकोनातून खादी व ग्रामोद्योग क्षेत्र ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे श्री. साठे यांनी नमूद केले.
0000

WhatsApp