दुष्काळ निवारणासाठी जालना जिल्ह्यातील थेंब न् थेंब पाण्याचे नियोजन करा – पालकमंत्री पंकजा मुंडे – महासंवाद

    - Advertisement -

    • गावागावांत शेतकरी समुपदेशन कार्यक्रम राबविण्याचे निर्देश
    • सामुहिक विवाह, शेतकरी संवाद सारखे उपक्रम राबवा

    मुंबई, दि. ८ : जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दुष्काळ परिस्थिती जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाणी, चारा, पीक नुकसान, पीकविमा आणि रोजगार हमीच्या कामांचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश पशुसंवर्धन व पर्यावरणमंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जालना जिल्हा प्रशासनाला दिले. उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी टँकरच्या प्रत्येक फेरीचे जीपीएसद्वारे नियंत्रण, टँकर ज्या ठिकाणी उभा राहतो तेथे जलपुनर्भरणाची व्यवस्था आणि नदी-नाल्यांचे खोलीकरण, पुनर्जीवन व जलस्रोतांच्या बळकटीकरणावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

    जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली. जालना जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे, पीकविमा, धरणांतील पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, चारा, टँकर, रोजगार हमी योजना तसेच शहरी भागातील पाणीपुरवठ्याचा यावेळी आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जालना महापालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा काटेकोर वापर करावा. जिल्हाधिकाऱ्यांनी पिण्याचे पाणी, धरणांतील जलसाठा, जलस्रोतांचे बळकटीकरण, टँकर व्यवस्थापन आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी सर्वंकष मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करून सादर करावी.

    पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, जालना जिल्ह्यातील ९५४ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून, सुमारे ६ लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्र पंचनाम्याच्या कक्षेत आहे. आतापर्यंत सुमारे ६० टक्के गावांमध्ये पंचनामे पूर्ण झाले असून, क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ५३ टक्के आणि खातेदारांच्या दृष्टीने सुमारे ६१ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जालना जिल्ह्यात सुमारे ५ लाख ८१ हजार खातेदार असून, त्यापैकी ३ लाख ५६ हजार खातेदारांचे पंचनामे झाले आहेत. आठवडाभरात पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे पाठविण्याचे आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवावे.

    पंचनाम्यांत पारदर्शकतेवर भर

    पंचनामे तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त समितीमार्फत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मागील वर्षीच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर यंदा पंचनाम्यांमध्ये पारदर्शकता आणि वस्तुनिष्ठता राखण्यावर भर देण्यात येत आहे. पीकविम्याबाबतही प्रशासनाला विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यात सुमारे दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असून सोयाबीनसाठी प्रस्तावित ३१२ प्रयोगांपैकी ९५ प्रयोग पूर्ण झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

    धरणांत मर्यादित पाणीसाठा

    जिल्ह्यातील प्रमुख, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा अत्यल्प असून त्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. ‘‘टँकर जिथे उभा राहतो, तिथे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. त्यामुळे टँकर भरण्याचे आणि वितरणाचे ठिकाण जीपीएसद्वारे निश्चित करा. ज्या ठिकाणी टँकरमधून पाणी दिले जाते, तिथे जलपुनर्भरणाची व्यवस्था करून पाण्याचा एक थेंबही वाया जाणार नाही, याची दक्षता घ्या,’’ असे निर्देश पंकजा मुंडे यांनी दिले. परवानगीशिवाय बोअरवेल घेण्यास कडक निर्बंध घालावेत. प्रत्येक टँकरला जीपीएस प्रणाली जोडून पाणी भरण्याच्या ठिकाणापासून वितरणापर्यंत त्याचे संनियंत्रण करावे. टँकर उभा राहणाऱ्या ठिकाणी जलतारा किंवा शोषखड्डा तयार करून सांडणारे पाणी भूजल पुनर्भरणासाठी वापरावे. जवळील विहीर अथवा हातपंपाच्या पुनर्भरणाचीही व्यवस्था करावी, असे निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी दिले.

    पाणी वापरात दहा टक्के कपातीच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करावी. बांधकामे, क्रशर, रस्ते आणि महामार्गांच्या कामांसाठी पिण्यायोग्य किंवा शुद्ध पाणी वापरले जाणार नाही, यासाठी आवश्यक नियंत्रण ठेवावे. उद्योगांनी शक्य तेथे प्रक्रिया केलेल्या किंवा पुनर्वापरयोग्य पाण्याचा वापर करावा. खासगी बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर नियंत्रित करण्याबाबत शासनस्तरावरील धोरणात्मक निर्णयासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

    चारा नियोजन योग्य प्रकारे करा

    प्रत्येक तालुक्यात सुरू केलेल्या चारा साक्षरता अभियानातून मुरघास, हायड्रोपोनिक्स, अझोला आणि चाऱ्याच्या योग्य वापराची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना द्यावीत. गाळपेर क्षेत्राचा चारा उत्पादनासाठी उपयोग करावा. आवश्यकता भासल्यास गावपातळीवर चारा डेपो सुरू करून टॅग केलेल्या जनावरांच्या संख्येनुसार चारा आणि पाण्याचे नियोजन करावे, असे पालकमंत्री मुंडे यांनी निर्देशित केले.

    ‘रोजगार हमी’तून जलसंधारणाला प्राधान्य

    दुष्काळाच्या काळात रोजगार उपलब्ध करून देतानाच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतील कामांचा जलसंधारणाशी संबंध जोडण्याच्या सूचना पालकमंत्री मुंडे यांनी दिल्या. नदी-नाल्यांचे खोलीकरण, पुनर्जीवन, जलस्रोतांचे बळकटीकरण आणि गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश पंकजा मुंडे यांनी दिले. ‘‘पुढील पावसाळ्यातही दुष्काळाची शक्यता गृहीत धरून आत्तापासूनच नियोजन करा. येणारा प्रत्येक पाण्याचा थेंब अडवला आणि जिरवला पाहिजे,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.

    विहिरी, तलावांचे ऑडिट

    दुर्लक्षित व गाळाने भरलेल्या विहिरींचे सर्वेक्षण करून त्यांची स्वच्छता व पुनर्बांधणी करण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. नैसर्गिक तसेच कृत्रिम तलावांचेही ऑडिट करून आगामी काळातील जलसाठ्यासाठी आवश्यक कामांचे नियोजन करण्यासही त्यांनी सांगितले. नगरपालिकांच्या पाणीपुरवठ्याचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. थकीत वीजबिलामुळे बंद असलेली खडकपूर्णा पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यात येईल. पाणीटंचाईची तीव्र शक्यता असलेल्या गावांमध्ये रिचार्ज शाफ्ट, बंधारे आणि नाला खोलीकरणाच्या कामांना टप्प्याटप्प्याने निधी देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

    शेतकरी समुपदेशनावर विशेष भर

    दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर निर्माण होणारा मानसिक ताण लक्षात घेता गावागावांत शेतकरी समुपदेशन कार्यक्रम राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. ग्रामसेवक, तलाठी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि सरपंच यांनी संवेदनशील कुटुंबांवर विशेष लक्ष ठेवावे, असे त्यांनी सांगितले. ‘‘दुष्काळाच्या परिस्थितीत केवळ पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था पुरेशी नाही. शेतकऱ्यांना विश्वास देणे आणि त्यांच्याशी संवाद साधणेही तितकेच महत्त्वाचे आहे,’’ असे पालकमंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.

    २५० गावांचा ‘दत्तक’ योजनेत समावेश

    पाणीटंचाईची तीव्रता असलेल्या गावांसाठी विविध संस्था, व्यक्ती, मंदिरे, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून गाव दत्तक घेण्याची संकल्पना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी मांडली. सुमारे २५० गावांसाठी अशा स्वरूपाचे नियोजन करण्यात येत असून, दुष्काळग्रस्त कुटुंबांशी संवाद साधणे, आवश्यक मदत उपलब्ध करून देणे आणि दिवाळीच्या काळात सामाजिक आधार देण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. ही संकल्पना उत्तम असून आपण स्वतःही एक गाव दत्तक घेणार असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

    जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, जालना जिल्ह्यातील शेतीचे पंचनाम्याची कार्यवाही वेगाने सुरू असून लवकरच ते पूर्ण करण्यात येतील. सर्व जिल्हा महिला व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रत्येक गावातील महिलांची बैठक घेऊन त्यांचे समुपदेशन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच दुष्काळपरिस्थितीत मुलींच्या विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी सामूहिक विवाह सोहळे आयोजनाचा विचार सुरू आहे. तसेच शेतकरी संवाद सारखे उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.

    ०००

    नंदकुमार वाघमारे/विसंअ

    - Advertisement -